खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील खालापूरजवळ हॉटेल रिंकीसमोर गोरेगाव मुंबई येथून लोणावळा येथे वर्षा सहलीसाठी जाणारी मिनीबस घसरून पलटी झाली. शुक्रवारी (दि. 29) संध्याकाळी झालेल्या या अपघातात मिनीबसमधील बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
वर्षा सहलीसाठी पर्यटकांना घेऊन मिनीबस गोरेगाव मुंबई येथून लोणावळा येथे जात होती. पावसामुळे महामार्ग निसरडा झाल्यामुळे खालापूरजवळच्या हॉटेल रिंकीसमोर शुक्रवारी संध्याकाळी 4.30वाजण्याच्या सुमारास मिनीबस घसरून पलटी झाली. या अपघातात मनोज पवार (वय 54), मनिषा पवार (वय 50), प्रमोद पवार (वय 23), राजेश शिंदे (वय 22), शितल शिंदे (वय 21), रितेश हातोसकर (वय 34), सुजाता हातोसकर (वय 30), अरुण सिसोदिया (वय 43), नितीश कुमार, सिध्देश घोडके, बबन वाघमारे, व मोहम्मद रहमान हे प्रवासी जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे बाबू पुजारी, गुरू साठीलकर, खालापूर उपनगराध्यक्ष राजेश पार्टे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना लागलीच खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल शहा यांनी त्यांच्यावर उपचार केले.
शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास खोपोली-पेण मार्गावरील हॉटेल ऋषीवनजवळ मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात खोपोलीतील तरुण लखन गोरखे जागीच ठार झाला.