पेण पोलिसांची कामगिरी
पेण : प्रतिनिधी
पेणमधील वाशीनाका येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या आरोपी पती मोहन रामअवतार यादव (वय 38) याला पेण पोलिसांनी बिहारमधील झांझा, जिल्हा- जमुई येथून अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी रुपेश चंद्रकांत म्हात्रे (वय 30, रा. सरेभाग, वाशी ता. पेण) याची बहिण आणि मोहन यादव यांचा विवाह 11 वर्षांपूर्वी झाला होता. विवाहानंतर मोहन यादव याने दारू पिऊन पत्नीला मारहाण तसेच तिचा शारीरिक छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून त्याच्या पत्नीने 29 जुलै 2022 रोजी विषारी औषध प्राशन केले. तिला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिथे तिचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यापासून आरोपी मोहन यादव फरार होता.
याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आरोपी पती मोहन यादव याच्या विरोधात भादंवि कलम 306, 498अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक समद बेग, हवालदार राजेंद्र भोनकर, पोलीस शिपाई पुंडलिक कारखिले यांचे पथक 7 ऑगस्ट रोजी आरोपींच्या तपासासाठी बिहारमध्ये गेले होते. गोपनीय व तांत्रिक बाबींच्याआधारे त्यांनी आरोपी मोहन यादव याला त्याचे नातेवाईक मुरारी यादव (रा. झाझा, जि. जमुई – बिहार) यांच्या घरातून 11 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. आरोपी मोहन यादव याला 13 ऑगस्ट रोजी पेण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास पेण पोलीस करीत आहेत.