Breaking News

झोपडपट्टीतील नागरिकांच्या जीवाशी महावितरणाचा खेळ

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल शहरात झोपडपट्टीत महावितरणने विजेचे 12 मीटर एका बॉक्समध्ये बसवून तेथून  झोपडीतील ग्राहकाला विजेचे कनेक्शन देताना तेथे पोल न उभारता झोपडीच्या पत्र्यावरून वायर नेल्या आहेत. या वायर अनेक ठिकाणी कापल्या असल्याने त्या ठिकाणी अनेक वेळा शॉर्टसर्किट होते. पावसाळ्यात यामुळे झोपडीतील पत्र्यात वीज प्रवाह उतरल्यास तेथील लोकांच्या जीवाला धोका असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून महावितरण त्यांच्या जीवाशी खेळ करीत आहे असेच म्हणावे लागेल.

पनवेलमधील माल धक्का, लक्ष्मी वसाहत, इंदिरा नगर आणि नवनाथ नगर या झोपडपट्ट्यांत महावितरणने झोपडीतील खाजगी मीटर काढून   ठराविक अंतरावर बॉक्स बसवून त्यामध्ये प्रत्येकी 12 मीटर बसवले आहेत. या मीटरपासून त्या ग्राहकाच्या झोपडीपर्यंत वायर ओढताना त्या झोपडीच्या पत्र्यावरून घेतल्या आहेत. या वायर अनेक ठिकाणी कापल्या गेल्याने त्या ठिकाणी अनेक वेळा शॉर्टसर्किट होते. त्या वेळी महावितरणचे कर्मचारी वायर बदलण्याचे पैसे घेतल्याशिवाय वायर बदलून देत नसल्याचीही तक्रार आहे. पावसाळ्यात सुटणार्‍या वार्‍यामुळे या वायर पत्र्याला घासून कट झाल्यास विजेचा प्रवाह त्या झोपडीत उतरू शकतो. त्यामुळे घरातील व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

रेल्वे स्टेशनजवळील मालधक्का येथील झोपडपट्टीत  अनेकांच्या घरात असलेले विजेचे मीटर काढून वीज चोरी होऊ नये म्हणून 12 मीटर एका बॉक्समध्ये बसवण्यात आल्याचे सांगितले. हे मीटर बसवताना त्या ठिकाणी खांबावरून वीज वाहक वायर न नेता झोपडीच्या पत्र्यावरून नेल्याने या वायर ओढताना अनेक ठिकाणी कापल्या गेल्या आहेत. त्यामुळे मालधक्का झोपडपट्टीत राहणारे सुदाम जाधव यांच्या घरात अनेक वेळा शॉक बसल्याने त्यांनी महावितरण कार्यालयात तक्रार करून वायर काढण्यात येत नसल्याने त्यांनी पुन्हा 6 जून रोजी आपल्या घराच्या भिंती ओल्या झाल्याने शॉक बसत आहे म्हणून घरावरील सर्व्हिस वायर काढून टाकण्याची मागणी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे केली आहे. याबाबत महावितरणच्या  अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन  पाहणी  केल्याशिवाय काही सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

महावितरणच्या नियमाप्रमाणे विजेच्या मीटरपर्यंत वायर जोडून देण्याची जबाबदारी त्यांची असते, पण आमचे मीटर आमच्या घरातून काढून घरापासून दूरवर महावितरणने बसवले आहेत. त्यामुळे आमच्या घरापर्यंत जोडणी देणे त्यांचे काम असताना मीटर पुढील वायरची जबाबदारी आमची नाही, असे सांगून महावितरणाचे अधिकारी अपघात झाल्यास हात वर करतील, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply