तरुण, लहानग्यांमध्ये संचारला उत्साह
पाली : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या काळात सुधागड तालुक्यात ढोल-ताशा या पारंपरिक वादनाची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. कोरोना काळात दोन वर्षे निर्बंध होते मात्र आता सर्व निर्बंध हटल्याने गणेशोत्सवात ढोल-ताशा-ध्वज पथकाला अधिक पसंती आहे. गणेशोत्सवात आपल्या ताल व लयबद्ध वादनाने हे ढोलताशा पथक सगळ्यांच आकर्षित करीत आहेत. पारंपरिक संस्कृती टिकावी आणि तरुणांमध्ये विविध कौशल्यांचा विकास व्हावा या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक ढोल-ताशा-ध्वज पथक प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात साधारण 15 ते 20 ढोलताशा पथक आहेत. डिजे व डॉल्बीपेक्षा आता पारंपरिक वाद्यांकडे सगळेच जण आकृष्ट होत आहेत. गणेशोत्सव, शिवजयंती, शिवराज्याभिषेक, नवरात्र, पाडवा अशा विविध सणांमध्ये हमखास ढोल-ताशा पथक आपल्या पारंपरिक कलेचा नमुन मोठ्या प्रमाणात सादर करतांना दिसतात. काही ढोल-ताशा पथक अनेक सामाजिक उपक्रमदेखील राबवतात. कोणत्याही ढोल ताशा पथकात प्रामुख्याने ढोल, ताशा, टोल, ध्वज (ध्वजावर मानाचा कळस) टोल गाडी व झांज आदी साहित्याचा समावेश असतो. वेळोवेळी या सर्व साहित्याची योग्य देखभाल करावी लागते. प्रत्येक ढोल-ताशा पथकाचे स्वतःचे असे काही नियम असतात, ते प्रत्येक सदस्यांना पाळावे लागतात. त्यामध्ये सरावास नियमित हजर राहणे, ठरविलेला गणवेश परिधान करणे आदी नियमांचा समावेश आहे.
तरुणांसह लहान मुलेदेखील या पारंपरिक वादनाकडे आकर्षित होत आहेत. कित्येकांना ढोल हातात मिळाला नाही तर ते बैचेन होतात. गणेशोत्सव काळात ढोल-ताशा पथकांना खूप मागणी आहे. त्यासाठी कित्येक दिवस सरावही केला जातो.
-उमेश तांबट, संयोजक वीर गर्जना पारंपरिक ढोल-ताशा पथक, पाली
गणेशोत्सवासाठी जवळपास दिड महिना आधीपासून ढोल-ताशा-ध्वज पथकांचा सराव सुरु होतो. सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सराव चालतो. पथकात साधारण 8 ते 45 वर्षे वयोगटाचे सदस्य आहेत. तसेच आत्तापर्यन्त 250 पेक्षा अधिक सदस्य प्रशिक्षित केले आहेत
-रोहन धेंडवाल, संस्थापक अध्यक्ष, जगदंब ढोल-ताशा-ध्वज पथक, महाड