सहकुटुंब, सहपरिवार मुंबई दौर्यावर येऊन गेलेल्या अमित शाह यांच्या दौर्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे संचारले असल्यास नवल नाही. कारण देवदर्शनाच्या मधल्या काळात त्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि आमदारांच्या गाठीभेटीही घेतल्या. मुंबई महापालिकेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी सर्वस्व पणाला लावून दीडशेच्या वर जागा जिंकून दाखवाव्यात, असे स्फूर्तीदायक आवाहन त्यांनी यावेळी केले. भारतीय जनता पक्षाचे अजिंक्य व्होटिंग मशीन असे ज्यांचे वर्णन केले जाते, ते ज्येष्ठ नेते अमित शाह श्रीगणरायाच्या दर्शनासाठी सोमवारी मुंबईत येऊन गेले. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येणे, हा एक अद्भुत अनुभव असतो, असे ट्विट त्यांनी सकाळीच केले होते. दिवसभरात त्यांनी लालबागच्या राजापासून भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या बांद्रे येथील गणेश मंडळाच्या बाप्पापर्यंत अनेक ठिकाणी भेटी दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी प्रतिष्ठापना झालेल्या श्रीगणेशाचेही आवर्जून दर्शन घेतले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यातील विघ्नहर्त्यालाही दंडवत घातला. ‘मेघदूत’ या सरकारी निवासस्थानी, भाजप कार्यकर्त्यांसाठी रीतसर मांडव घालण्यात आला होता, तेथे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सडेतोड भाषण करताना कार्यकर्त्यांना चेतविलेच, शिवाय शिवसेनेच्या ठाकरे समर्थक गटाचाही खरपूस समाचार घेतला. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, धोका देणार्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे, हिंदुत्त्व विरोधकांना जमीन दाखविण्यासाठी आपसातील मतभेद विसरुन कार्यकर्त्यांनी मैदानात उतरावे, असे ते म्हणाले. अमित शाह यांच्या या उद्गारांमुळे ठाकरे समर्थक आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची झोप उडाली असणार यात शंका नाही. मुंबई महानगर पालिका हे ठाकरे समर्थकांचे गंडस्थळ राहिले आहे. आज शिवसेनेची शकले झाली असली तरी, कालपरवापावेतो एकसंध असलेल्या या पक्षाने उणीपुरी चार दशके या महानगरावर सत्ता गाजवली आहे. गेल्या खेपेला भाजपने शिवसेनेच्या विरोधात कडवी लढत उभी करुन जवळपास विजय हासिल केला होता. अगदी थोड्या फरकाने सत्ता शिवसेनेकडे गेली होती. त्यावेळी हातातून गेलेली संधी यंदा सोडायची नाही, या निर्धाराने भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी मैदानात झुंजतील, हे उघड आहे. भाजपने खंजीर खुपसल्याची भाषा शिवसेनेचे ठाकरे समर्थक नेते नेहमीच करत असतात. वास्तविक कोणी कोणाला धोका दिला, आणि त्याचे पुढे काय झाले, हे महाराष्ट्राच्या तेरा कोटी लोकसंख्येने पाहिले आहे. गेल्या वेळेला भाजपच्या जागा पाडून शिवसेनेने अंतर्गत राजकारणाची चुणूक दाखवलीच होती. भाजपसोबतची युती शिवसेनेला कधी पचलीच नव्हती, एवढाच त्याचा अर्थ आहे. प्रत्येक पक्षाला स्वतंत्रपणे वाढायचा अधिकार असतो, आणि सत्ताही हवी असते. त्यात वावगे असे काही नाही. परंतु, त्यासाठी सत्याला पायदळी तुडवणे माफ करण्याजोगे नाही. ‘शिवसेनेला जमीन दाखवा’ असे गृहमंत्री शाह म्हणाले, त्याचा हाच अर्थ आहे. त्यांच्या एक दिवसाच्या दौर्यामुळे भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांमध्ये बारा हत्तींचे बळ आले आहे. ‘अभी नही तो कभी नही’ अशी आक्रमक घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात यावेळी दिली. त्याचे तंतोतंत पालन झालेले आगामी निवडणुकीत मुंबईकरांना दिसेलच. घोडामैदान फार दूर नाही. यंदा मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर भाजपचा केसरिया ध्वज फडकणार, अशी चिन्हे आत्ताच दिसू लागली आहेत.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …