नवी मुंबई : बातमीदार
मुंबईनंतर आता नवी मुंबईही कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहे. गेल्या काही दिवसांत दरदिवशी कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असून रुग्णांची संख्या शंभरी पार झाली आहे. शुक्रवारी सहा नव्या पोजिटिव्ह रुग्णांची भर यात पडल्याने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 103 पर्यंत गेली आहे. बुधवारी महापे येथील एका आयटी कंपनीतील 19 कर्मचार्यांचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने खळबळ उडाली होती. त्यांनंतर शहरातील 96 जणांचे अहवाल पालिकेला प्राप्त झाले त्यातील 6 पॉजिटिव्ह तर 90 निगेटिव्ह आढळून आले. यात तुर्भे येथील घरकाम करणार्या महिलेच्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तिच्या पती व सात वर्षीय मुलाचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. दिवागाव येथील कोरोना बाधित नर्सच्या संपर्कात आलेल्या घणसोली येथील महिलेचा अहवाल पोजिटिव्ह आला आहे. नेरुळ सेक्टर 16 ए येथे राहणार्या व शिवडी येथे वॉर्डबॉय म्हणून काम करणार्या व्यक्तीला बाधा झाली आहे. कोरपरखैरणे येथील रहिवासी असलेली व माईंड स्पेस येथे आयटी इंजिनिअर असलेल्या महिलेची चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. तसेच वाशी सेक्टर 29 येथे राहणार्या व कर्करोगावर उपचार घेणार्या महिलेची कोरोना टेस्ट पोजोटिव्ह आली आहे. अशा एकूण सहा जणांची वाढ झाली आहे. तर कोपरखैरणे सेक्टर 19 येथील पॉजिटिव्ह महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तिला घरी सोडण्यात आले.