Breaking News

म्हसळ्यातील पर्जन्यमापक केंद्र सदोष ठिकाणी; शेतकर्‍यांना बसतोय फटका

म्हसळा : प्रतिनिधी

तालुक्यातील देहेन आणि म्हसळा येथील पर्जन्यमापक यंत्रे सदोष व तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आल्याने पावसाची नोंद प्रकारे होत नाही. त्यामुळे नियोजन चुकत असल्याचे म्हसळा तालुक्यातील शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. जिल्हा नियोजन व विकास परिषदेकडून नाविन्यपुर्ण बाब म्हणून मंडळ निहाय पर्जन्यमापक यंत्रे बसविण्याचा निर्णय 2013 साली झाला. त्यानुसार म्हसळा तालुक्यातील खामगांव मंडळातील पर्जन्यमापक यंत्र देहेन येथील कृषी चिकित्सालय व म्हसळा मंडळातील पर्जन्यमापक यंत्र शहरातील मराठी शाळेत बसविण्यात आले आहे. घरे व झाडे यांच्या उंचीच्या चौपट अंतराच्या आत पर्जन्यमापक बसवू नये, वार्‍यापासून तो संरक्षित असावा,  पर्जन्यमापक कधीही उतार असलेल्या जमिनीवर, भिंती लागत, इमारतींच्या गच्चीवर, भिंतीवर किंवा छपरावर बसवू नये अशा स्पष्ट तांत्रिक सूचना असूनही म्हसळा तालुक्याचे मुख्य पर्जन्यमापन केंद्र सदोष व तांत्रिकदृष्टया चुकीच्या ठिकाणी आहे. म्हसळा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान किमान 3300 ते 3500 मिमी व कमाल 4500 मिमी  असल्याचे कृषी व महसुल विभागाच्या नोंदणीत आहे. मागील सहा वर्षाच्या नोंदी पहाता तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 4344 मिमी आहे. तालुक्यात मंडळनिहाय म्हसळा व खामगांव (देहेन) या दोन ठिकाणी महसूल विभागाची पर्जन्यमापक यंत्रे आहेत. 3 सप्टेंबर 2022 रोजी महसुली नोंदीनुसार म्हसळ्यात 2622 मिमी आणि खामगांव येथे 1568 मिमी पाऊस पडल्याच्या नोंदी आहेत. या नोंदीप्रमाणे म्हसळ्याला सुमारे 1054 मिमी पाऊस जास्त पडला. मात्र जाणकारांच्या अंदाजानुसार म्हसळ्यापेक्षा खामगाव परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असते. दरम्यान, तालुक्यातील खामगाव मंडळातील पर्जन्यमापक यंत्र देहेन येथेे तर म्हसळा मंडळातील पर्जन्यमापक यंत्र शहरातील मराठी शाळेत बसाविल्याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे आहे. मात्र या दोनही ठिकाणच्या नोंदी महसुल विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply