Breaking News

मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक निकाल अंदाज स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी

23 मे हा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे तसतसे लोकसभा निवडणूक निकालांबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असून केवळ राजकीय निरिक्षक किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीच नव्हे तर सुजाण नागरिकही निवडणूक निकालांबाबतची आपली भाकिते मोठ्या विश्वासाने व्यक्त करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी भाषक पत्रकारांसाठी लोकसभा निवडणूक निकाल अंदाज स्पर्धा जाहीर केली आहे.

ही स्पर्धा दोन प्रकारात विभागण्यात आली आहे. मुंबईच्या 6 जागा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड आणि मावळ आदी भागांचा समावेश असणार्‍या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एमएमआरडीए हद्दीत येणार्‍या सर्व लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक निकालाचे अचूक अंदाज वर्तविणार्‍या पत्रकारास रु. 5001/- चे रोख पारितोषिक देण्यात येईल. एकाहून अधिक विजेते असल्यास पारितोषिकाची रक्कम विभागून देण्यात येईल.

तर स्पर्धेच्या दुसर्‍या प्रकारासाठी रोख रु 10,001/- चे पारितोषिक आले असून स्पर्धकांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचे अचूक अंदाज वर्तविण्याचे आव्हान आले आहे. याही विभागात एकाहून अधिक विजेते असल्यास पारितोषिकाची रक्कम विभागून देण्यात येईल. ही स्पर्धा विनाशुल्क असून महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषक पत्रकारांना ती खुली आहे. इच्छुकांना स्पर्धेच्या कोणत्याही एका प्रकारात वा दोन्ही प्रकारात भाग घेता येईल. स्पर्धकांना प्रत्येक गटासाठी एकेक प्रवेशपत्रिकाच पाठविता येईल, मात्र स्पर्धकांनी आपल्या अचूक निकाल पत्रिका, दोन स्वतंत्र लिफाफ्यातून व त्यावर तसा स्पष्ट उल्लेख करून, अध्यक्ष/कार्यवाह, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई 40001 या पत्यावर शनिवार दि. 18 मे, 2019 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्या. तदनंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. स्पर्धा निकालाबाबतचा अंतिम निर्णय मुंबई मराठी पत्रकार संघाचा असेल व तो सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. या स्पर्धेचा निकाल दि. 24 मे 2019 रोजी जाहीर होईल. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन सोहळ्यात, 21 जून 2019 रोजी सायंकाळी पारितोषिक वितरण होईल. पत्रकार बांधवांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेऊन ती यशस्वी करावी, असे आवाहन पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण यांनी केले आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply