Breaking News

भारतातील गरिबांची आणि माझी जात सारखीच : नरेंद्र मोदी

रॉबर्ट्सगंज ः वृत्तसंस्था

 विरोधी पक्षाचे नेते माझ्या जातीवरून प्रश्न उपस्थित करीत आहेत, पण मी सर्वांना सांगू इच्छितो की, देशाच्या गरिबांची आणि माझी जात सारखीच आहे, असे रोखठोक प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे विरोधकांना दिले. ज्यांना आपण गरीब आहोत असे वाटते, अशा लोकांच्या जातीतील मी आहे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (दि. 11) उत्तर प्रदेशातील रॉबर्ट्सगंज येथे प्रचार सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. मायावती यांनी जातीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या टीकेचा मोदींनी या वेळी खरपूस समाचार घेतला.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. पूर्वी देशात फक्त घोटाळे उघड व्हायचे. जगभरात देशाची नाचक्की झाली होती, पण लोक म्हणायचे ‘झालं ते झालं’. सत्तेभोवती दलालांची पकड होती. रिमोट कंट्रोलद्वारे चालणार्‍या सरकारला देशाला पुढे नेण्यासाठी मोठे निर्णय घेता आले नाहीत, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली.

जनता जेव्हा जागी होते त्यावेळी हुआ तो हुआ, असे म्हणणार्‍यांना हवा हो जावो, असे सांगण्याची ताकद फक्त जनतेतच असते. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे नेते त्यांचे देशासाठीचे धोरण काय आहे हे सांगत नाहीत. मोदींना शिव्या देणे हेच त्यांच्या प्रचाराचे धोरण आहे. सपा-बसपाने उत्तर प्रदेशला उद्ध्वस्त केले आणि आता स्वत: उद्ध्वस्त होऊ नये म्हणून एकत्र आले आहेत, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी मायावती आणि अखिलेश यादव यांच्यावर टीका केली.

 जिथून मत नाही, तिथे विकास नाही, असा महामिलावटी लोकांचा सिद्धांत आहे, पण तुमच्या या चौकीदाराने राजकारणातील ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा देशात महामिलावटी सरकार येते, त्यावेळी देशाची सुरक्षा धोक्यात येते. या लोकांनी देशाच्या सुरक्षेकडे सदैव दुर्लक्ष केले आहे. महामिलावटी सरकारने देशाच्या गुप्तचर यंत्रणेला पोखरून उद्ध्वस्त केले होते. परिणामी याचा फटका देशाला बसला होता, असा गंभीर आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी या वेळी विरोधकांवर केला.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply