Breaking News

नागोठणे वन खात्याकडून बांधकाम उद्ध्वस्त

जागा आपलीच असल्याचा परस्परांकडून दावा

नागोठणे : प्रतिनिधी

जागा आपली असल्याचा दावा करीत येथील वन विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 16) नारायण सॉ मिल रस्त्यालगत चाललेले वाढीव बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले. याबाबत घरमालक हवाबी हसनमिया गोलंदाज या महिलेने जागा आमचीच असल्याने बांधकाम केले असल्याचा दावा केला असून वन खात्याने बांधकाम तोडून माझ्यावर अन्यायच केला आहे व त्यांचे विरोधात कुटुंबासह लवकरच उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नागोठणे येथील नारायण सॉ मिल रस्त्यालगत वन खात्याचा डेपो आहे. येथील वन विभागाचे मुख्य अधिकारी के. डी. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनाने सर्वे नंबर 114/1, 114 /2, 115/1, 115/ 2 अ, 115 / 2ब, 115 /3, 115 /4, 128 / 0, 129, 130/2, 130/6 एवढी जागा वेगवेगळ्या मालकांकडून 1963 साली खरेदी केली होती व त्याचे पैसे मूळ मालकांना दिल्यानंतर 17/3/1967 भूसंपादन करण्याबाबतचा आदेश, अवॉर्डद्वारे निर्गमित करण्यात आला होता असे स्पष्ट केले. हवाबी गोलंदाज यांचे येथे जुने घर असून, त्यांनी याठिकाणी वाढीव बांधकाम केले असल्याने वन खात्याकडून त्यांना मंगळवार (दि. 14) नोटीस पाठवून सर्वे नंबरचे प्रकरण अलिबाग न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने काम थांबविण्याचा सल्ला दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे.

नोटीस बजावल्यानंतर दोनच दिवसात म्हणजे गुरुवारी (दि. 16) वनखात्याने फौजफाट्यासह तेथे येऊन बांधकाम तोडले असल्याने माझ्यावर अन्याय झाला असल्याचे हवाबी गोलंदाज यांचे म्हणणे आहे. ही जागा वन खात्याची आहे, असे जर त्यांचे म्हणणे असेल तर, त्यांनी 1967 साली जागा ताब्यात घेतल्यावर चुकीची सीमा का आखली, असा गोलंदाज यांचा सवाल आहे. विशेष म्हणजे वन खात्याच्या ताब्यातील जागेचे सर्वे नंबर आजही जुन्या मालकांच्याच नावावर असल्याचे स्पष्ट होत आहे. गोलंदाज यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे जुने घर सर्वे नं. 115/2/ब  या  जागेत असून, बांधकाम पाडल्याने आपले हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे व त्या विरोधात न्याय मागणारच, असे हवाबी गोलंदाज यांनी स्पष्ट केले.

संबंधित जागांचा सर्वे नंबर आजही जुन्या व्यक्तींच्या नावावरच आहे, असे वनाधिकारी ठाकूर यांनी संबंधित प्रतिनिधीजवळ मान्य केले. मात्र, आमच्या कार्यालयाकडून वन खात्याच्या नावावर संबंधित जागेचा सर्वे नंबर होण्यासाठी वेळोवेळी महसूल कार्यालयाचे लक्ष वेधले असून त्यांच्याकडून सहकार्य केले जात नसल्याची खंत के.डी. ठाकूर यांनी व्यक्त केली.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply