जिल्हाध्यक्ष अश्विनीताई पाटील यांची माहिती
खोपोली : प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे सेवा पंधरवड्यांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून उत्तर रायगड जिल्ह्याच्या नऊ मंडलातील अंगणवाड्या दोन महिन्यांसाठी दत्तक घेतल्याची माहिती महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी स्थानिक प्रतिनिधीशी बोलताना दिली.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महिला मोर्चा कोकण प्रांत अध्यक्ष नीलम गोंधळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथे पूर्वतयारी बैठक झाली होती. या बैठकीस संघटक अविनाश कोळी व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष व कोकण प्रांत अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाच्या वतीने उत्तर रायगड मंडलात ज्या ज्या दुर्लक्षित अंगणवाड्या आहेत तेथील बालकांना पोषण आहार तसेच मूलभूत सुविधा म्हणजे पिण्याचे पाणी, शौचालय त्याचप्रमाणे गरोदर मातांच्या सकस आहाराबाबत सोय होते की नाही याची संपूर्ण नोंद घेऊन उत्तर रायगड जिल्ह्यातील सर्व नऊ मंडलातील अंगणवाड्या दोन महिन्यांसाठी दत्तक घेण्यात आल्या आहेत.
अंगणवाड्या दत्तक योजनेसाठी जिल्ह्यातील महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, माजी जि. प., पं. स. सदस्य, माजी नगरसेविका, मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेही मोलाचे सहकार्य मिळाल्याचे जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी बोलताना सांगितले.