Breaking News

‘बरसात’75वर्षे; बरसात मे हमसे मिले तुम…

’बरसात’ असं म्हणताक्षणीच आर. के. फिल्मचा सुपरिचित म्हणा वा रसिकांच्या किमान तीन पिढ्यांच्या माईंडमध्ये सेट झालेला म्हणा ’ट्रेड सिम्बॉल’ डोळ्यासमोर येणारच. डाव्या हातात गिटार घेतलेला नीली आंखोवाला राज कपूर व त्याच्या उजव्या हातावर विश्वासाने मंत्रमुग्ध झालेली नर्गिस….एकाद्या चित्रपट निर्मिती संस्थेच्या अशा लोगोला स्वतःची ओळख असणे, त्याला ग्लॅमर असणे, त्यामुळे त्या बॅनरचे चित्रपट अथवा चित्रपटांमुळे अनेक वर्ष ओळखले जात असलेले अनेक चित्रपट हेदेखील मोठे यशच…. हा लोगो आर. के. फिल्मचे कला दिग्दर्शक एम. आर. आचरेकर यांचे रेखाटन आहे. मूळ कृष्ण धवल असलेले हे रेखाटन कालांतराने रंगीत झाले ते जागतिक ख्यातीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून. आर. के. फिल्मचा पहिला रंगीत चित्रपट राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’ (1964)च्या वेळेस हा योग आला. हा संदर्भ सर्वप्रथम समजला तो बाळासाहेबांच्या निधनाच्या वेळेस (17 नोव्हेंबर 2012) मनोजकुमारने एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना हे सांगितले. काही वर्षातच दिग्दर्शक राहुल रवैल यांच्या आत्मचरित्रातही हा तपशील आहे.
’बरसात’ असा अनेक संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट. 21 एप्रिल 1949 रोजी प्रदर्शित झालेल्या या क्लासिक चित्रपटाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि अशा मोठ्या यशस्वी प्रवासानंतरही हा चित्रपट आपली ओळख देतो. त्यानंतरही राजकुमार संतोषी दिग्दर्शित (1995) आणि सुनील दर्शन दिग्दर्शित बरसात (2005) या नावाचे चित्रपट आले (दोन्हीत बॉबी देओल हीरो. राजकुमार संतोषी दिग्दर्शित ’बरसात’च्या वेळेस बॉबी देओलच्या पहिल्या चित्रपटासाठी ते नाव आपल्या विजयता फिल्म या बॅनरखालील चित्रपटाला मिळावे म्हणून धर्मेंद्रने रणधीर कपूरशी संवाद केल्याचा किस्सा गाजला) तरी ’बरसात’ म्हटलं की आर. के. फिल्म बॅनर, आर. के. स्टुडिओ निर्मिती संस्था, राज कपूर व नर्गिस ही लोकप्रिय जोडी आणि त्यातील सर्वच्या सर्व दहा सुपरहिट गाणी हेच आठवते.
’बरसात’चा मुहूर्त 1947च्या दसर्‍याच्या दिवशी झाला. आपल्या चित्रपटाचा मुहूर्त गाण्यांनी करायचा ही राज कपूर पद्धत. यावेळी दोन गाण्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले. संगीतकार शंकर सूर्यवंशी आणि जयकिशन पांचाळ. अर्थात शंकर जयकिशन. तेव्हा ते पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटर्स या नाट्यसंस्थेच्या रंगपटात रात्री वाद्य वाजवत. शंकर तबला तर जयकिशन पेटी वाजवत. राज कपूरने त्यांना चित्रपटाचे संगीतकार म्हणून ’बरसात’च्या वेळेस पहिली संधी दिली.
’बरसात’मधील प्रेमिकाचं (राज कपूर) प्रेयसीवरील (नर्गिस) प्रेमाची रित काही वेगळीच आणि तीच त्या काळातील चित्रपट रसिकांना भारी आवडली. हा प्रियकर झिंज्या पकडून नायिकेला जवळ ओढतो. छातीशी धरतो. अशातच तो तिच्या थोबाडीतही लावतो (त्याचं प्रेमच त्याला हा हक्क देतो.) त्याचा हा आक्रस्ताळेपणा (’आवारा’पन) प्रेयसीला आवडायचं. हे सगळेच प्रेमाच्या ’बरसात’मधील एक रंग. तो पडद्यावरील प्रेयसीला आणि ती भूमिका साकारत असलेल्या नर्गिसलाही आवडतेय हे ’कॅमेरा’ लपवू शकत नव्हता. हे प्रेम, हे आलिंगन, ही मस्ती काही वेगळीच होती.
’आग’पासून ’जागते रहो’पर्यंत अशा 16 चित्रपटात राज कपूर व नर्गिस एकत्र आले. या प्रवासात राज कपूरमधील रोमान्स, दिग्दर्शक, गीत संगीताचा आणि संकलन असा सगळाच बहर आला आणि नर्गिसची त्याला पडद्यावर व पडद्यामागेही उत्तम साथ मिळाली. (त्यातून जन्माला आलेले गॉसिप्स आजही चघळले जातेय). ते जणू खरे खुरे अर्थात प्रत्यक्षातील पती पत्नी असावेत अशी त्यांची केमिस्ट्री जमली होती. त्यात काही चित्रपट आर. के. फिल्मचे होते तसेच काही चित्रपट अन्य बॅनरखालील होते. (उदाहरणार्थ मेहबूब खान दिग्दर्शित ’अंदाज’) ’बरसात’ची वैशिष्ट्य अनेक. या चित्रपटाच्या यशानंतर राज कपूरने चेंबूरला भव्य आर. के. स्टुडिओची उभारणी केली. ’बरसात’च्या अगोदर राज कपूरने वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी आग (1948) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पाठोपाठ आलेला ’बरसात’ हा त्या काळातील चित्रपट अभ्यासकांच्या मते एक अतिशय मुक्त, मनस्वी, मनभावी चित्रपट. जितका उच्छृंखल तितकाच भावसखोल. या चित्रपटाची संपूर्ण देशात चर्चा रंगली. त्यानंतर राज कपूरने आवाराचे दिग्दर्शन केले. तर याच यशानंतर राज कपूर व नर्गिस यांनी आग, जान पहचान, प्यार, अंबर, अनहोनी, आशियाना, बेवफा, आह, धुन, पानी, श्री 420, चोरी चोरी, जागते रहो या चित्रपटात एकत्र काम केले.
’बरसात’ निर्मितीच्या दिवसांतील एक बहुचर्चित गोष्ट. नर्गिस अजून ’आर. के. फिल्म’मय झाली नव्हती आणि अन्य बॅनरखालील चित्रपटांतही भूमिका साकारत होती. त्यात ती के. बी. लाल दिग्दर्शित ’अंगारे’ या चित्रपटाच्या नासिर खानसोबत भंडारदरा येथील आऊटडोअर्सला शूटिंग करत होती. तर राज कपूर ’बरसात’साठी निम्मीसोबत पांचगणी येथे शूटिंग करत होता. खरं तर ’बरसात ’ची थीम पाहता कश्मीरमध्ये शूटिंग करणे आवश्यक होते, पण ते त्या काळात अधिकच खर्चिक असल्याने काही शूटिंग कश्मीरला केल्यावर पाचगणीत ते करत काश्मिरचा फिल देण्याचा प्रयत्न होता. (काश्मिरला शूटिंग झालेला हा पहिला चित्रपट) नर्गिसला पाचगणीतील शूटिंगची कल्पना आली. तिने एका रात्री दहा वाजता राज कपूरला पाचगणीला ट्रंकॉल लावला. तेव्हा तेच शक्य होतं. खरं तर त्यानंतर रात्रीच पाचगणीवरून निघून भंडारदराला जाऊन पुन्हा सकाळपर्यंत परत येणे अवघड होते, पण तरीही राज कपूरने आपले सहाय्यक दिग्दर्शक राजा नवाथे आणि ध्वनिमुद्रक अल्लाउद्दीन यांना घेऊन भंडारदराला जाण्याचा निर्णय घेतला. रात्री दीड वाजता ते भंडारदरा येथे पोहचले, नर्गिसला भेटले आणि सगळे पुणे शहरात एका हॉटेलमध्ये आले. सकाळी राजा नवाथे यांनी आपल्या ’बरसात’ च्या शूटिंगची राज कपूरला कल्पना दिली. राज कपूरने निर्णय घेतला. तो नर्गिसला भंडारदराला सोडायला जाणार आणि राजा नवाथे यांनी पाचगणीला जावून निम्मीच्या काही पासिंग दृश्याचे शूटिंग करावे.
’बरसात’ दोन मित्रांच्या दोन भिन्न स्वभावाच्या व स्वरुपाच्या प्रेमकथा. एक प्रेम प्राण (राज कपूर) आणि रेश्मा (नर्गिस) यांचे तर दुसरे प्रेम गोपाल (प्रेमनाथ) आणि नीला (निम्मी) या जोडीचे. या जोडीवरचे पतली कमर है या नृत्य गीताची क्रेझ भारीच होती आणि प्रेमनाथच्या अनेक वैशिष्ट्यांतील एक हे गाणे आहे. निम्मीचा हा पहिलाच चित्रपट.
काळ कितीही पुढे सरकला तरी काही चित्रपट कलाकृती कायमच आजच्याच राहतात, याचे श्रेय त्यातील प्रत्येकाचा आत्मियतेचा सहभाग आणि अशा अनेक महान क्लासिक चित्रपट कलाकृती पूर्वी पडद्यावर आल्या, चित्रपट रसिकांना त्या विलक्षण भावल्या.
राज कपूरचे गुरु केदार शर्मा यांच्या मते ’बरसात’ राजकपूरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. एक भावमधुर निसर्गरम्य आणि संगीतमय चित्रपट म्हणून ’बरसात’चा उल्लेख केला जातो
या चित्रपटातील ’बस करो, अब तो मै आ गयी ना’ हा नर्गिसच्या तोंडचा संवाद त्या काळी खूपच गाजला होता. ’बरसात’द्वारा शंकर-जयकिशन सारखे संगीतकार, शैलेंद्र सारखे गीतकार, हसरत जयपुरी, हे नावारुपाला आले. शैलेंद्र यांनी ‘बरसात में हमसे मिले तुम…’ आणि ‘पतली कमर है, तिरछी नजर है’ ही दोन गाणी लिहिली.’ रामानंद सागर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहीली होती. रामानंद सागर यांचा हा लेखक म्हणून पहिला चित्रपट होता. (काही वर्षांनी ते चित्रपट दिग्दर्शक झाले.) अभिनेते प्रेमनाथ व अभिनेत्री निम्मी रूपेरी पडद्यावर प्रथमच झळकले. या चित्रपटाने मुंबईत डॉ. भडकमकर मार्गावरील (पूर्वीचा लॅमिन्टन रोड) इंपिरियल थिएटरमध्ये खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. कलकत्त्याच्या पॅराडाईज सिनेमागृहात तो 114 आठवडे धो धो चालला. बरसातमधील गाणी एकापेक्षा सरस होती. एकाच चित्रपटातील सर्वच गाणी दर्जेदार म्हणूनच लोकप्रिय हे पूर्वीचे हुकमी समीकरण. (आणि आज? पिक्चर संपला की गाणी विसरली जातात.)
छोड गए बालम, हवा में उडता जाए, जिंदगी में हरदम रोता, बरसात में हमसे मिले तुम, जिया बेकरार है, मुझे किसी से प्यार, पतली कमर है, बिछडे हुए परदेसी, अब मेरा कौन सहारा, मेरी आँखों में बस अशी दहा गाणी या चित्रपटात होती. ’छोड गये बालम, मुझे हाय अकेला छोड गये.. बरसात में हमे मिले तुम सजन तुमसे मिले हम…’, ’हवा में उडता जाये, मेरा लाल दुपट्टा मलमलका’ या गाण्यांनी सिनेरसिकांना अक्षरशः वेड लावले. त्या काळात रेडिओ, उच्च मध्यमवर्गीयांच्या घरातील ग्रामोफोन, इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्स, वाद्यवृंद हीच गाणी ऐकण्याची प्रमुख माध्यमे. अशा वेळी हिच आवडती गाणी पडदाभर पाहण्यासाठी पुन्हा पिक्चरला जाणे हाच आवडता मार्ग होता. अशा लोकप्रिय गाण्यांमुळे एका पिढीतील हा चित्रपट अनेक पिढ्या ओलांडूनही हिट आहे. आर. के. फिल्मची दर्जेदार लोकप्रिय गाणी हे कायमच वैविध्य ठरले आहे.
’बरसात मे हमसे मिले तुम…’ एका क्लासिक चित्रपटाच्या पंचाहत्तरीनिमित्त हा फोकस.

– दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply