पनवेलमधील प्रकरणाचा छडा
पनवेल : वार्ताहर
पनवेल रेल्वेस्थानकाबाहेर 15 सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या प्रियंका रावत या महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावल्यानंतर यात सामिल असलेला प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत, त्याची प्रेयसी निकिता मतकर, तिचा साथीदार प्रवीण घाडगे तसेच तिघे सुपारी किलर अशा एकूण सहा जणांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. सर्वांनी मिळून नियोजनबद्धरित्या प्लॅन आखून प्रियंकाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पनवेलमधील विहीघर येथे राहणार्या मृत प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत याचे निकिता मतकर (24) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. देवव्रतसिंग आणि निकिता या दोघांनी ऑगस्ट महिन्यामध्ये मंदिरात लग्नदेखील केले होते. या दोघांमधील प्रेमसंबंधाची माहिती प्रियंका रावत हिला समजली होती, मात्र प्रेमात प्रियंका अडसर ठरत असल्याने तिचा कायमचा काटा काढल्यास देवव्रतसिंगसोबत आपल्याला पत्नी म्हणून कामयचे राहता येईल असा विचार निकिताने केला होता. याच विचारातून निकिता आणि देवव्रतसिंग या दोघांनी प्रियंकाची सुपारी देऊन तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
निकिता मतकर ही प्रवीण घाडगे या क्लास चालकाकडे टिचर म्हणून काम करीत होती व तिने घाडगे याला प्रियंकाची हत्या करण्यासाठी सुपारी किलरला शोधण्यास सांगितले होते. त्यानुसार घाडगेने बुलढाणा येथील सराईत गुन्हेगार असलेल्या तीन सुपारी किलरना तीन लाख रुपयांची सुपारी दिली तसेच त्यातील 2 लाख रुपयांची रक्कम आगाऊ देऊन हत्येनंतर एक लाख रुपये देण्याचे त्यांना कबूल केले होते. त्यानंतर देवव्रतसिंग याने पत्नी प्रियंकाच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्यावर तिघा सुपारी किलरनी 15 सप्टेंबर रोजी प्रियंका कामाला असलेल्या ठाण्यातील तिच्या कार्यालयापासून तिच्यावर पाळत ठेवली तसेच तिचा ठाण्यापासून पनवेलपर्यंत लोकलमधून पाठलाग केला.
प्रियंका पनवेल रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर तिघा सुपारी किलरपैकी पंकज नरेंद्रकुमार यादव (26) याने स्थानकाबाहेर प्रियंकाच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली व पलायन केले. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. खांदेश्वर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला होता. तपासादरम्यान खांदेश्वर पोलिसांना आलेल्या संशयावरून त्यांनी प्रियंकाचा पती देवव्रतसिंग याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर त्याचे निकिता मतकर हिच्यासोबत प्रेमसंबध असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देवव्रतसिंग आणि निकिता या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची स्वतंत्र चौकशी केल्यांनतर निकिताने प्रियंकाची हत्या घडवून आणल्याचे कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी देवव्रतसिंग, निकिता मतकर आणि प्रवीण घाडगे या तिघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करून बुलडाणा येथून रोहीत उर्फ शिव उर्फ रावत राजू सोनोने (22), दीपक दिनकर लोखंडे (25) आणि पंकज नरेंद्रकुमार यादव या तिघांना अटक केली. तिघेही सुपारी किलर मुंबईत सराईत गुन्हेगार असून पाचोरा येथील एका फायरींगच्या गुन्ह्यात फरारी आहेत.