भाजपचे 11 ऑक्टोबरला सिडको टाळे बंद आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोनिर्मित नागरी वसाहत असलेल्या नवीन पनवेल व खांदा कॉलनी येथील रहिवासी नागरिकांना होणार्या अपुर्या व अनियमित पाणीपुरवठ्याबद्दल 11 ऑक्टोबरला भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या नवीन पनवेलमधील कार्यालय येथे टाळे बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्या संदर्भात बुधवारी (दि. 28) भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी सिडकोला निवेदन दिले.
नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयात सिडकोचे सहाय्यक अभियंता सागर जगदाळे यांना निवेदन देतेवेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजेश्री वावेकर, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, जितेंद्र वाघमारे, शिवाजी भगत, लक्ष्मी चव्हाण, शारदा माने, रूचिता वागमनकर आदी उपस्थित होते.
सिडकोला देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सिडकोच्या माध्यमातून नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी अशा दोन नागरी वसाहती 40 वर्षांपूर्वी उभ्या करण्यात आल्या आहेत. त्या वेळी सिडकोने तेव्हाची लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था केली होती, तर अनेक ठिकाणी पाणी साठवणुकीसाठी काहीही व्यवस्था केली नव्हती. मागील एवढ्या 40 वर्षांच्या कालावधीत किमान चार पटींनी लोकसंख्या वाढली, मात्र पाण्याचे साठवण टाक्या आजही तेवढ्याच आहेत. शिवाय पाण्याच्या पाईपलाईन जीर्ण व खराब झाल्या असून नवीन पाईपलाईन कुठेही टाकण्यात आलेली नाही. याउपर ज्या धोकादायक झाल्या त्या पाडण्यात आल्या, पण तेथे नव्याने टाक्या उभारण्यात आल्या नाहीत. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची फार मोठी कमतरता भासत आहे. परिणामी नागरिकांना अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होतोच, मात्र काही ठिकाणी तिसर्या ते चौथ्या माळ्यापर्यंत पाणी पोहचत नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नवीन पनवेल व खांदा कॉलनी विभागासाठी पाण्याची आवश्यकता पाहता पाण्याच्या वाढीव स्रोतवाढीसाठी सिडकोकडून काय प्रयत्न केले गेले याची माहिती नागरिकांना महापालिकेला मिळत नाही.
अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे सिडकोबाबत नागरिकांच्या मनात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. पाण्याच्या या मूलभूत समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी सिडकोसोबत चर्चा, पत्रव्यवहार व आंदोलने करूनसुद्धा याची सिडकोने दखल घेतलेली नाही. उलटपक्षी होणार्या मोठमोठ्या बांधकामांना आणि टॉवर्सना नवीन पाण्याचे कनेक्शन देऊन इतर ठिकाणी कमी पाणी दिले जाते. ही बाब अतिशय खेदजनक व गंभीर आहे. वास्तविक या सर्व परिस्थितीला सिडकोच जबाबदार आहे, मात्र असे असताना या सर्व बाबींकडे सिडको दुर्लक्ष करीत असून अशा बेजबाबदार व भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या नेतृत्वाखाली 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता सिडकोच्या नवीन पनवेल कार्यालय येथे टाळे बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्या वेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सिडको प्रशासनाची राहील, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.