शहरात 160 संशयित, तर सहा पॉझिटिव्ह रुग्ण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
मुंबई सह ठाणे शहरात गोवर बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत रुग्णसंख्या 156 वर पोहचली आहे . त्याचबरोबर नवी मुंबईतही गोवरचे 160 संशयित रुग्ण असून 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने सतर्क बाळगण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरी आरोग्य केंद्र निहाय लसीकरण सत्रात घरोघरी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत बुधवारी याबाबत संबंधित अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गोवर रुग्णसंख्या वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबई शहरातील 23 नारी नागरी आरोग्य केंद्र निहाय लसीकरण सत्रात गोवर बाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरिक आरोग्य विभागात अडीच हजाराहून अधिक लहान बालके आहेत. नागरी आरोग्य केंद्रात दर बुधवारी 0-5 वयोगटातील बालकांचे लसीकरण सत्र होत असते. या लसीकरण सत्रात गोवर सदृश्य लक्षणे, ताप किंवा पुरळ आढळत आहेत का? याबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नवव्या महिन्यातील पहिली लसमात्रा आणि 18 महिन्यानंतर दुसरी लस मात्र घेणार्या मुलांना गोवर होत नाही, परंतु वयोगट 0 ते पाच वर्षांपर्यंत मुलांनी ही लस घेतली नसेल तर त्यांना गोवरची बाधा होते.
रुग्णालयात खाटा आरक्षित
मुंबईसह नवी मुंबईतदेखील गोवर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे गोवर बाधीत गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी नेरूळ येथील महापालिका रुग्णालयात आठ खाटा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. गोवरच्या उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाची आरोग्य स्थिती ढासळल्यास त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत. ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
आरोग्य नागरी केंद्रनिहाय लसीकरण सत्रात गोवर बाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये वयोगट 0 ते 5 वर्षांमधील बालकांना लसमात्रा दिलेली आहे का? याची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या घरामधील कोणाला ताप, पुरळ तसेच गोवर सदृश्य लक्षणे आहेत का? याबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
-प्रमोद पाटील, आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका