Breaking News

देशपातळीवरील ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील राहण्यायोग्य शहरांची स्पर्धा (ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स) आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देशातील 264 स्मार्ट सिटी प्रकल्पातील शहरे तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’मध्ये देशातील तृतीय क्रमांक मिळविणारे नवी मुंबई शहरही या स्पर्धेत सहभागी झाले असून देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये सर्वोत्तम शहराचा मानांकन प्राप्त करण्यासाठी सज्ज झाले आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्व विभागप्रमुख आणि विभाग अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन नागरिकांना तसेच पर्यटकांना नवी मुंबई शहराविषयी असलेले आकर्षण अधोरेखीत करीत देशातील प्रथम क्रमांकाच्या राहण्यायोग्य शहराचा बहुमान प्राप्त करण्यासाठी नागरिकांच्या मनात असलेली नवी मुंबई शहराविषयी प्रेमाची व अभिमानाची भावना अभिप्रायांच्या माध्यमातून मांडण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि इतर विभागप्रमुख प्रत्यक्ष तसेच सर्व विभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता वेब प्रणालीद्वारे उपस्थित होते. स्वत:च्या मालकीच्या प्रतिदिन 450 द.ल.लि. क्षमतेच्या मोरबे धरणाव्दारे नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा करणारे जलसंपन्न नवी मुंबई शहर नेहमीच आघाडीवर राहिले असून स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील मानांकन सातत्याने उंचावत राहिलेले आहे. शास्त्रोक्त भूभरणा पध्दतीवर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून खत निर्मिती, फ्युएल पॅलेट्स निर्मिती, डेब्रीजमधून बांधकाम साहित्य व पेव्हर ब्लॉक निर्मिती यामुळे देशातील सर्वोत्तम प्रकल्प मानला जातो. अत्याधुनिक सी-टेक तंत्रज्ञानावर आधारित सांडपाण्याचे शुध्दीकरण करणार्‍या सात मलप्रक्रिया केंद्रांव्दारे पर्यावरण संरक्षण केले जात आहे. त्यामधील प्रक्रियाकृत सांडपाण्याचा उद्याने, सोसायट्या, कारंजे यासाठी वापर केला जातो आहे. त्यामधील दोन मलप्रक्रिया केंद्रात टर्शअरी ट्रिटमेंट प्रकल्प स्थापन करून त्यामधील पुनर्प्रक्रियाकृत पाणी उद्योगसमुहांना वापरण्यास आता सुरुवात झालेली आहे. 225 हून अधिक उद्यानांमुळे नवी मुंबईची ओळख ‘गार्डन सिटी’ अशीही करून दिली जाते. तीन सार्वजनिक रुग्णालये, दोन माता बाल रुग्णालये, 23 नागरी आरोग्य केंद्रे याव्दारे उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 117 बालवाड्या 54 प्राथमिक आणि 19 माध्यमिक शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात आहे. 500हून अधिक बसेसमधून तसेच त्यातही पर्यावरणपुरक बसेसव्दारे समाधानकारक प्रवासी एनएमएमटी बस सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. 19 ग्रंथांलयांमधून वाचन संस्कृतीवाढीवर भर दिला जात आहे. पाच अग्निशमन केंद्रांव्दारे शहर सुरक्षेप्रती दक्षता बाळगण्यात  येत असून 264 हायटेक सीसीटिव्ही कॅमेरे मुख्य चौकात स्थापित करून शहर सुरक्षेचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने परदेशातून समुद्र ओलांडून फ्लेमिंगो नवी मुंबईत येत असून नवी मुंबईची ओळख ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून दृढ होत आहे. अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे नवी मुंबई हे नेहमीच नागरिकांचे आकर्षण केंद्र राहिले असून झपाट्याने विकसित झाल्यामुळेच ग्रामपंचायतीतून थेट महापालिकेत रुपांतर झालेले नवी मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे. नवी मुंबई शहर नेहमीच अत्याधुनिक प्रकल्प व गुणवत्तापूर्ण सुविधा पूर्ततेमुळे राज्य व  देशपातळीवर आघाडीवर राहिले असून नवी मुंबईच्या मानांकनात येथील नागरिकांच्या विविध उपक्रमातील सक्रिय सहभागाचा फार मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळे ‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही नवी मुंबई महानगरपालिका सहभागी होत असताना नागरिक अभिप्राय सर्वेक्षणात नवी मुंबईविषयीचा सार्थ अभिमान बाळगणारे नागरिक आपला सर्वोत्तम अभिप्राय नोंदवतील आणि आपल्या नवी मुंबई शहराला देशातील निवासयोग्य शहरांमध्ये नंबर वन चे शहर म्हणून सिध्द करतील असा विश्वास महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी व्यक्त करीत नागरिकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

‘शहराविषयी अभिप्राय नोंदवावेत’

राहण्यायोग्य शहरांच्या देशपातळीवरील स्पर्धेत नवी मुंबई नेहमीप्रमाणेच आपले वेगळेपण सिध्द करणारे शहर ठरणार असून त्यादृष्टीने ‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ स्पर्धे अंतर्गत घेण्यात येणारे नागरिकांचे अभिप्राय आपल्या नवी मुंबई शहराविषयी सर्वोत्तमच असतील, असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्यादृष्टीने नवी मुंबईकर नागरिकांपर्यंत विविध माध्यमांतून स्पर्धेची माहिती पोहचवावी व त्यांचे शहराविषयी अभिमान प्रदर्शित करणारे अभिप्राय नोंदवावेत, अशा सूचना सर्व विभागप्रमुख व विभाग अधिकारी यांना या बैठकीवेळी दिल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply