Breaking News

बा विठ्ठला… जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेेक्षा पूर्ण होऊ दे! मुख्यमंत्र्यांचे साकडे

पंढरपूर : प्रतिनिधी

राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्जन्यमान चांगले व्हावे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी  (दि. 12) विठ्ठलचरणी घातले. परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी अहमदपूरच्या वारकरी चव्हाण दाम्पत्याला या महापूजेचा मान मिळाला.

मुख्यमंत्र्यांनी पहाटे पंढरपुरातील मंदिरात सपत्नीक श्री विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेवाडी तांडा या गावचे वारकरी विठ्ठल चव्हाण व प्रयाग चव्हाण या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांचा मंदिर समिती आणि मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षी मला या ठिकाणी येता आले नाही तरी याची मला खंत नाही. कारण विठ्ठलाचा तसा आदेशच होता की, मी केवळ पंढरपुरात नाही; तर तुमच्या मनात आहे. तुम्ही जिथे माझी पूजा कराल तिथे मी आहे. त्यामुळे माझ्या वर्षा निवासस्थानी विठ्ठलाची पूजा करण्याची संधी मला मिळाली. मराठा आणि धनगर समाजासह इतर विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला. यासाठी सत्काराची गरज नव्हती. मी माझे कर्तव्य पार पाडण्याचे काम केले. ते करताना इतर समाजावर अन्याय होऊ दिला नाही. आपल्या कामांच्या यशापयशाचे मूल्यमापन जनता करते. त्यामुळे विठ्ठलरूपी जनतेची सेवा करण्याकरिता पाच वर्षांसाठी पुन्हा संधी मिळेल याची आशा करतो, अशा शब्दांत त्यांनी पुढील सरकार आपलेच असेल, असा विश्वास व्यक्त केला.

– पंतप्रधानांकडून शुभेच्छा

नवी दिल्ली, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी मराठी भाषेत ट्विट केले. ‘आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! विठूराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. महानायक अमिताभ बच्चन यांनीही ‘आषाढी’निमित्त मराठीतून शुभेच्छा दिल्या. ‘बिग बीं’नी तीन ट्विट करीत या शुभेच्छा दिल्या.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply