Breaking News

नवी मुंबईत सक्षम आरोग्य व्यवस्थेवर भर

पालिका रुग्णालयास कोट्यवधींची वैद्यकीय उपकरणे

आमदार गणेश नाईक यांचा पाठपुराव्याला यश

नवी मुंबई : बातमीदार

सँडोज कंपनीतर्फे ऐरोली येथील नवी मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयाला एक कोटी रुपयांची विविध वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली आहेत. आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते ही वैद्यकीय उपकरणे रुग्णालयाला हस्तांतरित करण्याचा सोहळा झाला. कंपनीच्या सीएसआर निधीतून ही उपकरणे रुग्णालयाला देण्यात आली आहेत. आमदार गणेश नाईक यांच्या मागणीनुसार ही वैद्यकीय उपकरणे पालिकेला कंपनीने देण्यात आली आहेत.

या सोहळ्यास माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते, कंपनीचे टेक ऑफ हेड इंडिया सुधीर भंडारे, टॅक्सेशन विभागाचे महाव्यवस्थापक पंकज गुप्ते, एचआरपी अँड ओ विभागाचे समीर कोरे,  अमेरिकेअर इंडिया फाउंडेशनचे डॉ. गुरुप्रसाद जानवेकर, कंपनीचे युनियन नेते सोमनाथ विरकर, व्यवस्थापक राहुल सातोस्कर, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा राठोड आदी उपस्थित होते.

नवी मुंबईमध्ये निर्माण केलेल्या सक्षम आरोग्यवस्थेमुळे आपले शहर कोरोनावर लवकर नियंत्रण प्राप्त करू शकले याचा उल्लेख करून शहरातील प्रत्येक विभागामध्ये अद्ययावत रुग्णालयाची निर्मिती करणार असल्याची माहिती लोकनेते आमदार नाईक यांनी दिली. दिघा, घनसोली,  कोपरखैरणे, तुर्भे इत्यादी विभागांमध्ये रुग्णालयासाठी कार्यवाही सुरू आहे.

सँडोज कंपनी व्यवस्थापनाकडे पत्र पाठवून आणि त्या अनुषंगाने चर्चा करून आमदार गणेश नाईक यांनी पालिका रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. एक कोटी रुपयांची उपकरणे हस्तांतरित करण्यात आली आहेत. यामध्ये ईसीजी मशीन, बेबी इंक्युबेटर, ईएनटी इंडॉस्कॉपी मशीन, फोटो थेरेपी मशीन अशा एकूण 85 महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. त्यांचा पुरेपूर उपयोग करून रुग्णालय व्यवस्थापनाने जनसामान्यांना चांगली वैद्यकीय सेवा देण्याचे आवाहन आमदार गणेश नाईक यांनी या वेळी केले. सँडोज कंपनीच्या सामाजिकतेचा त्यांनी या वेळी गौरव केला.

कंपनीचे टेक्निकल हेड सुधीर भंडारी यांनी सीएसआर निधीच्या माध्यमातून सँडोज कंपनी आणि नवी मुंबई शहराचे ऋणानुबंध घट्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून यापुढेही पालिका रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणांनी अद्ययावत करण्याचा मानस व्यक्त केला.

ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पही स्थापन

कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता पाहता आमदार गणेश नाईक यांच्या एक कोटी रुपयांच्या स्थानिक स्वराज्य विकास निधीमधून राजमाता जिजाऊ रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यात आला. आज या प्रकल्पातून निर्माण होणारा ऑक्सिजन या रुग्णालयातील रुग्णांचे प्राण वाचवत आहे

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply