नवी मुंबई : बातमीदार
शहर स्वच्छतेमधील डेब्रीज ही एक मोठी समस्या असून त्यावर मार्ग काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या प्रकल्पस्थळाला भेट देत तेथील कार्यप्रणालीची सविस्तर पाहणी केली व हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश दिले. या वेळी शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता शिरिष आरदवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नागरिकांना त्यांचा बांधकाम व पाडकाम कचरा महापालिकेकडे पुढील प्रक्रियेसाठी हस्तांतरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून त्याकरिता 8898017009 हा मोबाईल क्रमांक जाहीर केलेला आहे. या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास निश्चित केलेली रक्कम भरून नागरिकांचा बांधकाम व पाडकाम कचरा महापालिकेच्या वतीने संकलीत करण्यात येतो. याशिवाय शहरात खुल्या जागांवर अनधिकृतपणे डेब्रीज टाकले जाऊ नये याकरिता दोन डेब्रीज भरारी पथके परिमंडळनिहाय लक्ष ठेवून असतात.
तथापि विशेषत्वाने रात्रीच्या वेळी आडबाजूला अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला डेब्रीज टाकले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वच्छ शहराचे मानांकन सातत्याने उंचाविणारे शहर म्हणून नवी मुंबईकडे अपेक्षेने पाहिले जात असताना शहर स्वच्छतेला बाधा पोहचविणार्या अनधिकृतपणे टाकल्या जाणार्या डेब्रीजवर प्रतिबंध आणणे गरजेचे आहे. यादृष्टीने भरारी पथके सक्षम करणे व त्यांच्या सोबत शहर सौंदर्याला बाधा पोहचविणारे डेब्रीज उचलण्यासाठी वाहने उपलब्ध करून देणे याबाबीची मूल्यात्मक तपासणी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले.
सी अॅण्ड डी वेस्ट प्रकल्पस्थळी सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी करताना तेथील कामगारांनी सुरक्षा साधने नियमित वापरावीत अशा सूचना त्यांनी केल्या. याठिकाणी सी अॅण्ड डी वेस्टपासून तयार होत असलेले पेव्हर ब्लॉक, विटा यासारखे उत्पादन नवी मुंबई महापालिकेच्या बांधकामांमध्ये वापरावे तसेच बांधकाम व्यवसायिकांनाही ते वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आयुक्तांनी सूचित केले.
या वेळी प्रकल्पस्थळावरील ओल्या कचर्यापासून खत निर्मिती प्रक्रियेचीही आयुक्तांनी बारकाईने पाहणी करत माहिती घेतली. या प्रक्रियेत ओल्या कचर्यावर 28 दिवसांमध्ये बायोकल्चर फवारण्यात येऊन विन्ड्रोज तयार केले जातात. त्यानंतर विविध चाळण्यांमधून प्रक्रिया केली जाते व सेंद्रीय खत तयार होते. हे सेंद्रिय खत गार्ड़न सिटी अशी ओळख असणार्या नवी मुंबईतील विविध उद्याने फुलविण्यासाठी वापरले जात असून शेतकर्यांनाही याची विक्री केली जाते. या खताचे वितरण जास्तीत जास्त लोकांना केले जाईल याकडे लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
दररोज निर्माण होणार्या घनकचर्याचे नागरिकांनी घरातच ओला व सुका असे वर्गीकरण करावे याविषयी नागरिकांना प्रबोधन केले जात आहे. असा महापालिकेमार्फत संकलित केलेला वर्गीकृत कचरा वाहतुक करतेवेळी कोणत्याही प्रकारे एकत्रित होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले.