Breaking News

रायगडमधील झिराड झाले सायबर साक्षर सुरक्षित गाव

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड  जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सायबर गुन्हे रोखण्यासाठी गावागावात सायबर साक्षरता अभियान राबविले जात आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिराड गावात प्रायोगिक तत्वावर सायबर साक्षर सुरक्षित झिराड हे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे झिराड गाव सायबर साक्षर बनले आहे. रायगड जिल्ह्यात काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी कंबर कसली आहे. अशोक दुधे यांनी सायबर साक्षर सुरक्षित गाव ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील झिराड या गावाची प्रायोगिक तत्वावर निवड केली आहे. पोलीस निरीक्षक राजीव पाटील गेल्या दीड महिन्यापासून झिराडसह परिसरात सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती करीत आहेत. विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामस्थांमध्ये सायबर साक्षर गाव करण्यासाठी जनजागृती करीत आहे. त्यामुळे झिराड गावात सायबर गुन्हे रोखण्यात मांडवा सागरी पोलीस हे यशस्वी झाले आहेत. झिराड येथे जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात सायबर सुरक्षा अभियानाची सांगता कोकण परिक्षेत्र उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर जिल्हा अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, मांडव्याचे पोलीस निरीक्षक राजीव पाटील, सरपंच दर्शन भोईर, दिलीप भोईर आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. सायबर गुन्हे कशा पद्धतीने घडतात याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी नाटिकाही सादर केली.

गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून नागरिकांची 13 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार हे अनेक वेळा सापडत नाहीत. फेककॉल, संदेश, लॉटरी लागणारे मेसेज, बँकेचे फेक मेसेज याबाबत नागरिकांनी स्वतःच काळजी घेतली, तर हे गुन्हे आपण रोखू शकतो. त्यामुळे पालकांनी सायबर साक्षर होणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

-संजय मोहिते, पोलीस उपमहानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply