Breaking News

बाळाराम पाटील यांच्या प्रचार पत्रकातून माजी आमदार विवेक पाटील गायब

बाळाराम पाटील यांचे हे षडयंत्र -भाजप प्रवक्ते अ‍ॅड. प्रकाश बिनेदार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
शेकापचे बाळाराम पाटील निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार पत्रक वाटप करीत आहेत, मात्र त्यांच्या या पत्रकावर माजी आमदार विवेक पाटील यांच्या फोटोचा उल्लेख का नाही, असा सवाल भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस व प्रवक्ते अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांनी केला आहे. कर्नाळा बँक घोटाळ्यातून विवेक पाटील यांनी हजारो कुटुंबांच्या आयुष्याचे वाटोळे केले आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख निवडणुकीला सामोरे जाताना मोठी अडचण ठरणार आहे, याची जाण बाळाराम पाटील यांना असल्यानेच जाणीवपूर्वक विवेक पाटील यांना डावलण्यात आले आहे, असा सणसणीत टोलाही बिनेदार यांनी लगावला आहे.
बाळाराम पाटील यापूर्वी पनवेल विधानसभा निवडणुकीत सळग दोन वेळा पराभूत झाले. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून नशीब अजमावायला गेले एकदा त्यांना संधी मिळाली, पण आमदार होऊनही लोकांचे सोडाच शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यातही ते अपयशी ठरले. त्यामुळे मागील वर्षी झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव झाला. जनाधार नसतानाही पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याचा बाळाराम पाटील यांनी प्रयत्न सुरू केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक पक्ष या ठिकाणी उमेदवार उभा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये शेकापकडून बाळाराम पाटील यांची अद्याप उमेदवारी निश्चित झाली नसली तरी प्रचार पत्रक वाटून त्यांनी स्वयंघोषित उमेदवारी जाहीर केली आहे, मात्र या पत्रकात शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांचा फोटो वगळण्यात आला आहे.
विवेक पाटील यांनी केलेला घोटाळा सहकार क्षेत्राला हादरून सोडणारा आहे. असे असताना ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी शेकापने प्रयत्न केले नाहीत. उलट विवेक पाटील यांना पाठीशी घातले. मोदी केंद्र सरकारच्या विमा कायदा निर्णयामुळे पाच लाखपेक्षा कमी रक्कम असलेल्या ठेवीदारांना पैसे मिळाले, मात्र विवेक पाटील यांचे चिरंजीव व बँकचे संचालक फरार असून त्यांना अटक न झाल्याने पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असलेल्या तीन हजार ठेवीदारांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे उर्वरित ठेवीदारांच्या ठेवींवर टाच आली.
एवढा मोठा घोटाळा करूनही शेकापच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर घोटाळेबाज विवेक पाटील यांचा फोटो डौलाने झळकायचा, मात्र विवेक पाटील यांचा घोटाळा या निवडणुकीत मोठी अडसर आहे हे विशेषतः बाळाराम पाटील यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांची कुठेच नोंद घ्यायची नाही, असा निर्धार बाळाराम पाटील यांनी केला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आता या बाबीवर सारवासारव करण्याचा प्रयत्न शेकापकडून होईलच, मात्र विवेक पाटील यांच्या फोटोचा उल्लेख बाळाराम पाटील यांना परवडणारा नाही. यामुळेच त्यांनी विवेक पाटलांना आता गोदामामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला असेल, मात्र तुम्ही आतापर्यंत रोज बॅनरवर, सोशल मीडियावर विवेक पाटीलांचा फोटो लावत होता. आता निवडणूक काळापुरता त्यांचा फोटो टाळला असला तरी सर्वसामान्य जनता शेकापचा घोटाळा विसरणार नाही. शेकापच्या ज्या ज्या पदाधिकार्‍यांच्या नावावर कर्ज उचलून भ्रष्टाचार झाला आहे, त्या सर्व आरोपींना एके दिवशी तुरुंगात जावे लागेल याची सर्व सामान्य जनतेला जाणीव आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये शेकापचे पाप त्यांच्या पदरात घातल्याशिवाय सर्वसामान्य जनता स्वस्थ राहणार नाही, असेही प्रवक्ते अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांनी म्हटलेय.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply