खारघर ः प्रतिनिधी
मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या डुंगी पारगावच्या पुनर्वसनाला ग्रामस्थांनी एकत्र येऊन सहमती दर्शवली आहे. पारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या डुंगी गावाची निवड सिडकोने सुरुवातीलाच विस्थापन होणार्या गावांच्या यादीत केली होती. विमानतळाच्या भरावाला अगदी लागून असलेल्या डुंगी ग्रामस्थांनी विस्थापनास विरोध केला होता. विमानतळासाठी डुंगी ग्रामस्थांची जमीन मोठ्या प्रमाणात संपादित झाली, मात्र गावाचे संपादन झाले नव्हते. सिडकोनेदेखील ग्रामस्थांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन डुंगीला वगळले होते. गावाजवळ होणार्या विमानतळासाठी होत असलेल्या भरावामुळे गावात भरावाला सुरुवात होताच पाणी शिरू लागले. विमानतळासाठी डुंगी नदीचे पात्र बदलण्यात आले. वाघिवली खाडीकडे जाणारे पाणी वळविल्यामुळे समुद्राचे पाणी गावात शिरत असल्याची ग्रामस्थांची तक्रार होती. चार महिन्यांच्या कालावधीसाठी 49 हजार आणि सामान ने-आण करण्यासाठी 10 हजार असे एकूण 50 हजार रक्कम ग्रामस्थांना दिली जात होती. भविष्यातील त्रास लक्षात घे न ग्रामस्थांनी विस्थापित होण्याच्या सिडकोच्या प्रस्तावाला संमती दर्शविली, परंतु 128 घरांच्या सर्व्हेप्रमाणे सर्व घरांना बांधकामाचा मोबदला मिळावा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे हा प्रश्न रखडला होता. अखेर सध्याचे प्रांत अधिकारी राहूल मुंडके यांनी ग्रामस्थांना विस्थापनासाठी तयार करण्यास यश मिळविले. सिडकोने केलेल्या सर्व्हेप्रमाणे 46 घरांना विस्थापनासाठी पात्र ठरविण्यात आले. सध्या 46पैकी 35पेक्षा अधिक घर मालकांनी संमतीपत्र प्रांत अधिकारी कार्यालयाकडे जमा केले आहे. उर्वरित घरमालकदेखील लवकरच संमतीपत्र जमा करतील, असा विश्वास राहूल मुंडके यांनी व्यक्त केला. पुष्पकनगर येथील कुंडेवहाळ मंदीराजवळ सेक्टर 2 येथे डुंगीचे पुर्नवसन केले जाणार आहे.