- युवा जिल्हाध्यक्ष चषकावर रोहा संघाने कोरले नाव
- आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली उपस्थिती
धाटाव : प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 9) रोजी रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक येथील हनुमान मंदिर क्रीडांगणावर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने युवा जिल्हाध्यक्ष चषक स्पर्धा उत्साही वातावरणात रंगली. या स्पर्धेस भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहित केले तसेच आयोजकांचे कौतुक केले.
स्पर्धेचे उद्घाटन युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष निखिल चव्हाण यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत 32 संघांनी सहभाग घेतला होता. सामने चुरशीचे झाले. अंतिम लढत जय बजरंग रोहा आणि टीबीएम करावी या दोन बलाढ्य संघांमध्ये झाली. यामध्ये रोहा संघाने बाजी मारली.
प्रथम क्रमांक विजेत्या जय बजरंग रोहा संघाला 25 हजार व चषक, द्वितीय टीबीएम करावी संघास 15 हजार रुपये, तृतीय गावदेवी मुंढाणी व चतुर्थ जय हनुमान वाशी संघाला प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात आले. मालिकावीर सुयेश कान्हेकर, उत्कृष्ट चढाईपटू राहुल मोकल, उत्कृष्ट पकडपटू दिनेश खासे, पब्लिक हिरो विकास जोगडे या खेळाडूंनाही बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेला भाजप नेते अॅड. महेश मोहिते, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, सरचिटणीस मिलिंद पाटील, रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष हेमा मानकर, माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष अॅड. मनोजकुमार शिंदे, उपतालुकाप्रमुख संदेश मोरे, माजी नगरसेवक समीर सपकाळ, श्री. नांदगावकर, रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन वारंगे, तळाघर हायस्कूलचे चेअरमन विठ्ठल मोरे, हेमंत ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, धाटाव एमआयडीसीतील कंपन्यांचे मॅनेजर, पोलीस बांधव यांनी सदिच्छा भेट दिली, तर स्पर्धेसाठी आई गावदेवी क्रीडा मंडळ, जय हनुमान वाशी व राजमुद्रा फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.
अमित घाग सर्वांना सोबत घेऊन काम करणारा नेता -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी युवा जिल्हाध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंना शुभेच्छा देत उपस्थित क्रीडारसिकांना भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबोधित करताना सांगितले की, आपल्या जिल्ह्यात अनेक पद्धतीने राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोक काम करतात, परंतु लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तहानभूक विसरून व सर्वांना सोबत घेऊन काम करणारा आपला अमित घाग सहकारी आहे. त्यामुळे अर्या अर्थाने भाजपचे ते रायगड जिल्ह्यासाठी वैभव आहे. रोहा तालुक्यातील अनेक तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीवर सहकार्यांच्या सोबतीने आपल्या विचारांचा झेंडा फडकविला. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व आरोग्य वैभवशाली राहो या शुभेच्छा मी देतो.