भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. भारताने ऑलिम्पिकच्या अॅथेलेटिक्स प्रकारात मिळविलेले हे पहिले, तर वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक आहे. नीरजच्या पदकासह भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे सात पदके जिंकलीत. खेळाडूंची मेहनत आणि मोदी सरकारची साथ यातून हे साकारलेय. खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे जगभरातील खेळाडू आणि दर्शकांसाठी पर्वणी असते. दर पाच वर्षांनी होणार्या या स्पर्धेत पदक जिंकणे हे प्रत्येक क्रीडापटूचे स्वप्न असते. त्यासाठी प्रचंड मेहनत आवश्यक असते. कारण जगातील अव्वल खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत असल्याने सर्वांचाच पदकासाठी कस लागतो. त्यातही सुवर्णपदकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जेवढी जास्त सुवर्णपदके तेवढा तो देश पदकतालिकेत अव्वल असे सर्वसाधारण समीकरण आहे. शिवाय एखाद्या देशाचा खेळाडू जेव्हा सुवर्णपदकावर नाव कोरतो तेव्हा त्या देशाच्या राष्ट्रगीताची धून ऑलिम्पिकमध्ये वाजत असते. भारताचा युवा खेळाडू नीरज चोप्रा याने आपल्या कारकिर्दीतील विक्रमी भालाफेक करून कोट्यवधी नागरिकांच्या अंगावर रोमांच उभे केले आणि आपली मान गर्वाने उंच केली. हरियाणातील एका शेतकरी कुटुंबातील नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेली कामगिरी निश्चितपणे कौतुकास्पद आहे. भारतीय युवक मनात आणले तर काय करू शकतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नीरज. त्याची मेहनत, आत्मविश्वास थक्क करणारा आहे. लष्करात नायब सुभेदार असणार्या नीरजने पाच वर्षांपूर्वीच या स्पर्धेची तयारी सुरू केली होती. एका मुलाखतीमध्ये बोलताना त्याने, ऑलिम्पिकसाठी जोरदार तयारी करावी लागेल. माझा सध्याचाच परफॉर्मन्स कायम राहिला, तर मी विश्वास देतो की आपल्या देशासाठी नक्कीच मेडल जिंकून आणेन, असे म्हटले होते. आपला शब्द त्याने खरा करून दाखविला. नीरजचे पदक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. तो शोपीस इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा देशातील पहिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलिट ठरला आहे. भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी 1900च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्स प्रकारात दोन पदके जिंकली होती, परंतु प्रिचर्ड हे इंग्रज होते. नीरजने भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. याचबरोबर भारताचे ऑलिम्पिकमधील हे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णवेध घेतला होता. यानंतर 13 वर्षांनी भारताच्या खात्यात ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नोंद झाली. नीरजच्या यशाला आणखी एक झालर लाभली ती म्हणजे या पदकासह भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या पदकांची संख्या सात झाली. लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांचा विक्रम भारताने यंदा मोडीत काढला. नीरजच्या आधी यंदा वेटलिफ्टर मीराबाई चानू, (रौप्य), कुस्तीपटू रवी दहिया (रौप्य), पुरुष हॉकी संघ (कांस्य), बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (कांस्य), बॉक्सर लवलिना बोर्गोहाइन (कांस्य) आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया (कांस्य) यांनी पदके जिंकली आहेत. नीरजने सुवर्णपदकाची कमी भरून काढण्याबरोबरच एकूण पदकांचा नवा विक्रम देशाच्या नावे केला. यामागचे केंद्र सरकारचे सहकार्य आणि स्वत: पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना दिलेले प्रोत्साहनही विसरता येणार नाही. नीरज हा हरियाणातील पानिपतनजीकच्या खंड्रा गावातील रहिवासी असून त्यांचे पूर्वज मराठा होते असे आता समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या पठ्ठ्याने केवळ पानिपतच नव्हे; तर संपूर्ण जग जिंकले. हॅट्स ऑफ नीरज!
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …