नागोठणे : प्रतिनिधी
येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र जैन यांच्या बाजारपेठेतील घरामागील त्यांच्याच आवारातील जुने घर वजा गोडाऊनला बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली होती. तीन तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीवर वेळीच नियंत्रण ठेवण्यात यश आल्याने बाजारपेठ बचावली. आगीत दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज नरेंद्र जैन त्यांनी व्यक्त केला.
आग ज्या ठिकाणी लागली होती त्याठिकाणी जुनी लाकडे तसेच इतर टाकाऊ सामान ठेवण्याचे गोदाम होते. याठिकाणी विद्युत पुरवठा देण्यातच आला नसल्याने शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा प्रश्नच निकाली निघाला असल्याने घातपात किंवा अन्य कशाने आग लागली, हा प्रश्न त्यानिमित्ताने गुलदस्त्यातच राहिला आहे. दरम्यान, आग विझविण्यासाठी आलेल्या रिलायन्स आणि सुप्रिम पेट्रोकेम या दोन कंपन्यांच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी जाण्यासाठी कराव्या लागलेल्या कसरतीमुळे शहरातील वाढलेली अतिक्रमणे तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहात असलेल्या वाहनांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.