खेळाडूंचा किल्ले रायगडावर मानाचा मुजरा
अलिबाग : प्रतिनिधी
जिद्द, आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर 36व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील गुणवंत युवा खेळाडूंनी सोनेरी यश संपादन केले. 140 विक्रमी पदकांची कमाई करीत महाराष्ट्र संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. मिळालेली बहुमानाची ट्रॉफी घेऊन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने धनत्रयोदशीच्या दिवशी रायगड किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा केला. युवा खेळाडूंच्या सोनेरी आणि चंदेरी यशाच्या या ट्रॉफीने किल्ले रायगडचा परिसर उजळून निघाला.
ऑलम्पिक संघटनेने हा आगळावेगळा उपक्रम राबवला. या वेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख प्रदीप गंधे, निलेश जगताप, अमित गायकवाड, राजेंद्र घुले, शिवाजी साळुंखे, संदीप वांदळे, रायगड क्रीडा अधिकारी वनमाने, कुस्ती मार्गदर्शक शिवाजी कोळी आणि पदक विजेते खेळाडू उपस्थित होते.