स्वस्तातील स्वदेशी व्हेंटिलेटर बनविण्यात यश
पनवेल ः प्रतिनिधी
जगात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असताना तेवढी उपचार यंत्रणा आणि खासकरून व्हेंटिलेटर नसल्याने मृत्यूचा आकडा वाढत आहे. भारतात आणि महाराष्ट्रातही त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो हे ओळखून सोलर पॅनल क्लिनिंग रोबोट बनवणार्या आयसनमेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मूळच्या रायगड जिल्ह्यातील तीन तरुण इंजिनिअर्सनी कमी किमतीत स्वदेशी व्हेंटिलेटर बनविण्यात यश मिळविले आहे.त्यामुळे हिमालयाच्या मदतीला पुन्हा एकदा सह्याद्री धावला, असेच म्हणावे लागेल.
माणगावमधील गोरेगाव येथील महेंद्र चव्हाण एक रोबोटिक वैज्ञानिक तसेच आयसनमेटचे संस्थापक आणि रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट डायरेक्टर आहेत. त्यांनी लॉकडाऊन काळात कंपनी सुरू ठेवण्याची परवानगी व व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आवश्यक त्या परवानग्या मिळविल्या.
त्यांनी आपले मॅकॅनिकल इंजिनिअर असलेले मित्र मयूर गांधी यांना सोबत येण्याची विनंती केली. महेंद्र चव्हाण, मयूर गांधी व बंधू आकाश चव्हाण या तिघांनी आठ दिवसांत ऑक्सिमेट हे व्हेंटिलेटर बनवले. भारतीय बनावटीचे हे व्हेंटिलेटर आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तोडीचे असून त्यामुळे कोरोना रुग्णांचे जीव वाचवण्यास नक्कीच मदत होईल.