Breaking News

प्रजा संकटात, राजा मात्र घरात!

वाढत्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार दौरा

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या चार-पाच दिवसांत परतीच्या पावसाने राज्याला तडाखा दिला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली नाही. दुसरीकडे काही नेते विविध भागांचे दौरे करून परिस्थितीचा आढावा घेत असताना मुख्यमंत्री ठाकरे मात्र घराबाहेर पडायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. दरम्यान, वाढत्या टीकेनंतर मुख्यमंत्री सोमवारी म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर जाणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या भीतीने गेल्या अनेक महिन्यांपासून निवासस्थानीच आहेत. एखाद-दुसरा दौरा वगळता ते घराबाहेर पडलेले नाहीत. आता अस्मानी संकटात बळीराजाचे कंबरडे मोडले असतानाही मुख्यमंत्री ठाकरे यांना पाझर फुटला नाही. घरी बसून ते केवळ घोषणा करीत आहेत. वास्तविक अशा संकटकाळात त्यांनी शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन पाहणी करीत त्यांना धीर देणे अपेक्षित होते, मात्र मुख्यमंत्र्यांना काही घर सुटत नाही. त्यामुळे प्रजा संकटात आणि राजा मात्र घरात असे विदारक चित्र दिसून येत आहे. यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका होऊ लागली आहे.
भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीनेही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घरी बसण्याकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी सर्वांची मागणी आहे.  

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply