पनवेल : रामप्रहर वृत्त : नवी मुंबई विमानतळासाठी स्वत:ची गावे, राहती घरे सोडावे लागलेल्या काही ग्रामस्थांनी सिडकोने दिलेल्या जागेत बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे, मात्र या ग्रामस्थांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. ज्या जागेवर या विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जात आहे, त्या जागा पूर्वी ज्या ग्रामस्थांच्या होत्या, त्यांनी येथे स्वतःचा हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.
विमानतळासाठी स्वत:ची गावे आणि राहती घरे सोडावे लागलेल्या ग्रामस्थांचे सिडकोच्या वतीने पुष्पक नगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथे मोकळ्या भूखंडावर प्लॉट अधोरेखित करण्यात आले आहेत. तिथे ग्रामस्थांना स्वतःची घरे उभारायची आहेत. दहा गावांतील गणेशपुरी, तरघर या गावांतील ग्रामस्थांना उलवे नोड या ठिकाणी जागा देण्यात आली आहे. या जागा येथील जावळी गावातील ग्रामस्थांच्या आहेत. या जागांचे संपादन पूर्वीच सिडकोने केले आहे, मात्र या गावातील काही ग्रामस्थांनी या जागेवर बांधकाम करण्यास आक्षेप घेतला आहे. ‘या जागेवर बांधकामे करायची असतील, तर त्यासाठी आम्हीच बांधकाम साहित्याचा पुरवठा करू. अन्य कुणाला येथे काम करू देणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे या ग्रामस्थांना या ठिकाणी बांधकाम करण्यास अडचणी येत आहेत. बांधकाम करण्यासाठी लाकूड, दगड, माती, खडीसारखे साहित्य जागेवर
आणून ठेवल्यास रात्री हे साहित्य चोरीला जात आहे. त्यामुळे बांधकाम करायचे कसे, असा प्रश्न विमानतळ प्रकल्पग्रस्तांसमोर आहे.