अलिबाग ः प्रतिनिधी
महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागावर या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने व्हायरल झालेल्या या बनावट पत्रात राज्य सरकारची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली. त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी अज्ञाताविरोधात भा. दं. वि. कलम 500, 501, 505 (2), 505(3)सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे 66 सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर येथे उष्माघातामुळे झालेल्या श्री सदस्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एक सद्भावना पत्र जारी केले होते, मात्र या पत्राच्या मजकुरात फेरबदल करून अनुयायांमध्ये राज्य शासनाच्या विरोधात शत्रुत्वाची तसेच द्वेषभावना तयार होईल, सरकारविरोधात उठाव होईल या उद्देशाने खोटे पत्रक तयार करून ते समाजमाध्यमांवर टाकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दरम्यान, या बनावट पत्रकाचा प्रसार करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …