Breaking News

महावितरणचा वीज ग्राहकांना शॉक!

एकाच महिन्यात 2 वीजबिले माथी : रक्कम भरायची कुठून? ग्राहकांचा संतप्त सवाल

उरण : बातमीदार

महावितरणकडून वीज ग्राहकांना नेहमी एका महिन्याचे एकच वीजबिल येत असते मात्र चालू महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात प्रत्येक ग्राहकाला महावितरणतर्फे दोन वीजबिले देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहेत.

या बिलांच्या वाटपामध्ये एक नियमित वीजबिल तर दुसरे अतिरिक्त सुरक्षा रकमेचे वीजबिल आहे. ही दोन्ही वीजबिले एकाच वेळी नागरिकांना मिळाल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. उरण तालुक्यामध्ये या प्रकार उघडकीस आला आहे. आता हे रेग्युलर वीजबिल व दुसरे बिल अतिरिक्त सुरक्षा रकमेचे वीजबिल आता कसे भरायचे, पैसे कुठून आणायचे या विवंचनेत सर्वसामान्य वीजग्राहक सापडला आहे. महागाईत सर्वांत मोठा झटका वीज बिलांचा सर्वसामान्य ग्राहकांना बसल्याने एकाच वेळी दोन वीज बिले पाठवून महावितरण कंपनीने ग्राहकांना एकप्रकारे शॉक दिला आहे.

कोरोनामुळे नागरिकांच्या घरची परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. त्यातच महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आर्थिक घडी अजूनही व्यवस्थित बसलेली नसताना अचानक महावितरणने एकाच वेळी दोन वीज बिले पाठवून ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. एक बिल रेग्युलर आहे तर दुसरे वीज बिल सुरक्षा रकमेच्या नावाखाली देण्यात आलेले आहे. मात्र सुरक्षा रकमेच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा रुपये महावितरण ग्राहकांकडून वसुल करीत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे

कोरोना संपतो न संपतो तोच महागाईने डोके वर काढले आहे. महागाईला कंटाळून गेलेल्या नागरिकांना वीजबिलांचा शॉक बसल्याने नागरिक पूर्णपणे कंटाळले असून महावितरणच्या कारभारावर नाराज आहेत. अगोदरच महावितरण वीज विक्रीकर, स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, आदी भरमसाठ आकार(कर) महावितरण वीज बिलांच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी मारत आहे. आता तर दोन बिले मिळाल्याने नागरिकांना एकच शॉक बसला आहे.

वीजबिल नाही भरले तर वीज तोडण्यात येईल असे महावितरणच्या कर्मचार्‍यांमार्फत ग्राहकांना सांगण्यात येत आहे. या मुळे वीज ग्राहक घाबरून वीजबिले भरत आहेत. तर अनेक ग्राहकांचे मीटर बंद असूनही त्यांच्या माथी सरासरी वीज बिल मारण्यात आले आहे. नवीन मीटर उपलब्ध करून मीटर बदलून देण्याची मागणी केली असता तेही वेळेत उपलब्ध होत नसल्याने महावितरणचे ग्राहक या सर्व गैरसुविधांमुळे पूर्णपणे वैतागले आहेत.

महावितरणतर्फे नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास दिला जात नाही. प्रत्येक नागरिकांनी दोन्ही वीजबिले भरून महावितरणला सहकार्य करावे. एक रेग्युलर वीजबिल असून दुसरे सुरक्षा अनामत रक्कम अशी दोन्ही वीज बिले भरणे नागरिकांना अनिवार्य आहे. वीज ग्राहकांच्या वापरानुसार महिन्याचे वार्षिक सरासरी अंदाजे बिल काढले जाते. ज्यांचे वीज वापराचे युनिट अधिक आहे अशा सरासरी वीज बिलांवर अनामत रक्कम निश्चित केली जाते. ही रक्कम नियमानुसार महावितरणकडे सुरक्षित ठेवली जाते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने अनामत रक्कम भरून महावितरणाला सहकार्य करावे. -विजय सोनवले-अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उरण.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply