लोकप्रतिनिधी, पोलिसांची उपस्थिती
पनवेल ः वार्ताहर
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध गुन्ह्यांत आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला पाच कोटी 41 लाख 27 हजार 683 रुपये किमतीचा मुद्देमाल सोमवारी (दि. 14) आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी आणि पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मूळ मालकांना परत करण्यात आला.
जानेवारी 2022 ते जुलै 2023पर्यंत नवी मुंबई पोलिसांनी मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांत आरोपींकडून हस्तगत केलेले दोन कोटी नऊ लाख 23 हजार 384 इतक्या किमतीचे सोने व रोख रक्कम 74 फिर्यादींना; तर तीन कोटी 32 लाख चार हजार 99 इतक्या किमतीचा वाहन, मोबाईल, व इतर सर्वसाधारण मुद्देमाल 174 फिर्यादींना अशा एकूण 248 फिर्यादींना पाच कोटी 41 लाख 27 हजार 683 रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला. या वेळी मुद्देमाल परत मिळालेल्या फिर्यादींपैकी काहींनी मनोगत व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले.
वाशी येथील सिडको ऑडीटोरियम व एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त संजय मोहिते, अपर आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त अमित काळे, विवेक पानसरे, पंकज डहाणे यांच्यासह नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.