Breaking News

बदलते हवामान व परिणाम

गेल्या काही दिवसांपासून हवामानात पुन्हा बदल जाणवू लागला आहे. एकीकडे सकाळी व रात्री वातावरणात गारवा असताना दुसरीकडे दिवसा मात्र उन्हाचे चटके बसू लागले आहेत. वातावरणात अचानक होणार्‍या या बदलाचे परिणाम शेतीवर तर होतच असतात, शिवाय मानवी आरोग्याच्या तक्रारीदेखील सातत्याने बदलणार्‍या हवामानामुळे वरचेवर वाढीस लागल्या आहेत.

गेल्या वर्षी जोरदार पाऊस पडला. अनेक वर्षांचे विक्रम वरुणराजाने मोडित काढले. काही ठिकाणी पूर येऊन जीवित व वित्तहानीचीही नोंद झाली. त्यामुळे साहजिकच थंडीही जास्त पडेल असा अंदाज होता. त्यानुसार थंडीचा जोर जाणवला, मात्र अधूनमधून ती गायब झाली. पूर्वी ऋतूनुसार हवामान असायचे. पावसाळा म्हटला की पाऊस, हिवाळ्यात थंडी आणि ऊन्हाळा म्हणजे उष्णतेच्या झळा असे समीकरण ठरलेले असे. हल्ली मात्र ऋतूचक्र बदलले असून वर्षाच्या बाराही महिने कुठे ना कुठे पावसाच्या सरी पडत असतात. खासकरून पावसाळा हा जून ते सप्टेंबर या नेहमीच्या चार महिन्यांच्या कालमानात न राहता जुलै ते ऑक्टोबर असा असतो. एवढेच नव्हे तर तो नोव्हेंबरपर्यंत लांबतो आणि नंतरदेखील कधीही पडतो. यंदा थंडीतही चढ-उतार दिसून आले. कधी कडाक्याचा गारवा जाणवला, तर मध्येच गारवा सरून उकाडा होत होता. सद्यस्थितीत तर सकाळी व रात्री वातावरण थंड असते. दुपारी मात्र उन्हाच्या झळा लागतात. त्यामुळे दुपारच्या सुमारास फिरणे अवघड होऊ लागले आहे. या बदलत्या हवामानामुळे संसर्गजन्य आजारांची लागण नागरिकांना होऊ लागली आहे. ताप, थंडी, सर्दी, कोरडा खोकला यांसारख्या आजारांनी लोक त्रस्त आहेत. विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत अनेक रुग्ण दाखल झाले आहेत. ऊन व थंडीमुळे नागरिक बेजार झाले असून काहींना अशक्तपणा जाणवत आहे, तर काहींच्या शरीरातील पांढर्‍या पेशींचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र आहे. यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, कारण येत्या काळात उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. ज्या प्रमाणे थंडीच्या लाटा आल्या त्या प्रमाणे आता उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या वाढत्या तापमानाचे प्रमुख कारण म्हणजे प्रदूषण व कार्बन उत्सर्जन. हल्ली सर्रास कंपन्यांतील विविध वायू हे प्रक्रिया न करता हवेत सोडले जातात तसेच वाहनांंची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालल्याने प्रदूषण सर्वत्र पसरते. परिणामी विविध विकारांना मानवाला सामोरे जावे लागत आहे. या सर्वाला कारणीभूतही बर्‍याच प्रमाण मानवच आहे. हल्ली कुठेही, कशाचाही निर्बंध राहिलेला नाही. सिमेंट काँक्रीटची जंगले भारभर विस्तारत चालली आहेत. त्यासाठी वृक्षतोड, उत्खनन सुरू आहे. डोंगर सपाटीकरणाचाही अक्षरशः सपाटा लावण्यात आला आहे. जोडीला मानवनिर्मित वणवे आहेतच. एवढी सारी छेडछाड निसर्गाशी केल्यावर मग दुसरे काय होणार. निसर्ग आपला प्रकोप दाखवित आहे. मग पूर, त्सुनामी, दुष्काळ, ग्लोबल वॉर्मिंग, भूकंप अशी एक ना अनेक संकटे येत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच सार्‍याला आवर घालून ठोस उपाययोजना करणे काळाची गरज आहे. तेव्हाच आपण जे सुख अनुभवले ते आपण आपल्या पुढील पिढ्यांना देऊ शकतो. अन्यथा बदलत्या हवामानात विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये होणारा विध्वंस कुणालाही रोखता येणार नाही एवढे मात्र नक्की!

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply