अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचा कारभार यापुढे संगणकावर चालणार आहे. सर्व शाखा आता संगणकीकृत झाल्या आहेत. पुढील काही दिवसात पतपेढीत आरटीजीएस व एनइएफटी अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी घोषणा पतसंसथेचे अध्यक्ष राजेश सुर्वे यांनी दिली. पतपेढीच्या अलिबाग, महाड, माणगाव व मंडणगड या शाखेच्या सभासदांचा मेळावा नुकताच महाड येथे पार पडला. यावेळी अध्यक्ष सुर्वे यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. पतसंस्थेत आता ऑनलाइन सुविधा दिल्या जाणार आहेत. कारभार पेपरलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आरटीजीएस किंवा एनइएफटीसारख्या सुविधांमुळे सभासदांचा वेळ पैसा यांची बचत होईल शिवाय जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे. पतसंस्थेने यंदा 97 व्या वर्षात पदार्पण केले आहे. सभासदांना 25 लाख रूपयांपर्यंत कर्ज दिले जाते. सभासद मयत झाल्यास त्याच्या वारसांना 10 लाखांची मदत केली जाते. दुर्धर आजारासाठी 15 हजार रूपये विनापरतावा दिले जातात, असे सुर्वे यांनी सांगितले. पॅनल प्रमुख नरेंद्र गुरव यांनी मनोगत सांगितले की, संस्था चांगल्या पद्धतीने कारभार करत असून संस्थेने आजपर्यंत 65 लाख रुपयांचा मृत्यूफंड वितरीत केला आहे. तसेच संस्थेच्या नफ्याचा आलेख वाढत आहे. मेळाव्याच्या सुरुवातीला भारतरत्न लता मंगेशकर, अभिनेत रमेश देव व ज्ञात-अज्ञात मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या ठेवीदार माया कुचेकर, बळीराम साळवी, तसेच महाड व माणगाव तालुक्यातील शिक्षकांना विपषनेचे प्रशिक्षण दिल्याबद्दल मनिषा लावरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी सभासदांना संगणकीकृत पासबुकचे वितरण करण्यात आले. पूजा शहा, दिनेश गावंड, मनीषा लावरे, माया कुचेकर, किसनदेव यमगर, प्रशांत तुळसुळकर, स्मिता नवघरे, श्याम आवळे, प्रदीप शिंदे, सुधीर मांडवकर, बळीराम साळवी आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला महाड, पोलादपूर, मंडणगड तालुक्यातील सभासद शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.