Breaking News

जलस्रोतांचे नियोजन हवे

उत्तरेकडील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते, तर पश्चिम किनारपट्टीवरही जोरदार पाऊस कोसळतो. परंतु देशाच्या दक्षिणेकडील उर्वरित भागात पाऊस यथातथाच होतो. अत्यल्प पावसामुळे या परिसरात पावसाळा संपताच लगेचच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे यंदा तर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनावरच मोठा परिणाम झाला. यंदाही राज्यात नेहमीप्रमाणे निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण टोकाचे कमी-अधिक असल्याचे चित्र दिसू लागले आहे. कोकण विभागात नेहमीप्रमाणे चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. नेहमीच वरुणराजाची कृपा अनुभवणार्‍या मुंबई उपनगर, पुणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये 1 जूनपासून सरासरीपेक्षा 70 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद एव्हाना झाली आहे तर राज्यातील अन्य 17 जिल्ह्यांमध्ये आतापावेतो सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 78 टक्के अधिक पावसाची नोंद एव्हाना झाली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे पूरस्थितीची चिन्हे आहेत. वाडा आणि पालघर तालुक्यातील गावांना यापूर्वीच सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. येथील तानसा आणि मोडकसागर ही धरणे कोणत्याही क्षणी ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. पावसाचे अशाच तर्‍हेचे विषम प्रमाण देशभरातही पाहायला मिळते. महाराष्ट्रापर्यंत मान्सूनचे आगमन झाले खरे, पण संपूर्ण राज्यभर पावसाला सुरूवात होण्यास जवळपास पंधरा दिवसांचा उशीर झाला. त्यामुळे पेरण्यांचे गणित कोलमडून शेतकरी हवालदिल झाला. बेभरवशाच्या मान्सूनवर आधारित शेती हे आपल्या शेतकर्‍यांचे मोठे दुखणे आहे. तसेच संपूर्ण देशभरात मिळून पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत असला तरी निरनिराळ्या भागांत हे पाणी विषम प्रमाणात उपलब्ध असल्याने कुठे भीषण पाणीटंचाई तर कुठे ओला दुष्काळ अशी स्थिती एकाच वेळी पाहायला मिळते. पाण्याचा वापरही तसाच नियोजनशून्य व मोठे नुकसान करणार्‍या पद्धतीने केला जातो. देशभरातील जलस्रोतांचे नियोजन हे नियोजनकर्त्यांच्या समोरील मोठे आव्हान कायमच राहिले आहे. आपल्याकडे जगभरातील जमिनीच्या 2.5 टक्के जमीन आहे, जगभरातील शुद्ध जलस्रोतांच्या 4 टक्के जलस्रोत आपल्याकडे आहेत. परंतु जगातील लोकसंख्येच्या 16 टक्के लोकसंख्याही आपल्याकडेच आहे. देशातील उपलब्ध जलसाठ्यांवर ताण येण्यामागे प्रचंड मोठी लोकसंख्या हे एक प्रमुख कारण आहे. शेतीसाठीही पावसाच्या पाण्याचा वापर अतिशय नियोजनशून्य रीतीने व मोठ्या बेपर्वाईने केला जातो. देशात पडणारा अवघा पाऊस हा फार कमी काळात होतो. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपाची पूरस्थिती अनेक भागांमध्ये पाहायला मिळते. भूपृष्ठावर पडणारे पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात लगेचच समुद्राला जाऊन मिळते. हा पाण्याचा अक्षम्य असा अपव्यय आहे. एका पाणलोट क्षेत्रातील पाणी दुसरीकडे वळवण्यातून, नवे जलसाठे निर्माण करण्यातून, पारंपरिक जलसाठ्यांचे पुनर्निमाण करून, धरणे, विहिरी बांधून, शहरी भागात पावसाचे पाणी साठवण्याचे आधुनिक उपाय राबवून अशा अनेक मार्गांनी हा अपव्यय टाळता येऊ शकेल. त्यातूनच, कुठे भेगाळली भुई आणि कुठे ओला दुष्काळ ही परिस्थिती बदलता येऊ शकेल.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply