Breaking News

स्वातंत्र्याचा उत्सव

भारतीय स्वातंत्र्याचा 76वा वर्धापन दिन मंगळवारी साजरा होणार आहे. स्वातंत्र्य मिळवून अमृत महोत्सवी अर्थात 75 वर्षांचा टप्पा आपला देश पार करतोय. यानिमित्ताने वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशाभिमानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच माझी माती, माझा देश अभियानाची घोषणा केली आणि क्रांती दिनापासून याचा शुभारंभ झाला. त्याचबरोबर यंदाही घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपला भारत देश आज विविध क्षेत्रांत प्रगती तसेच प्रतिनिधित्व करतोय. जागतिक पातळीवर भारताने वेगळे असे स्थान प्राप्त केले आहे. हे काही सहजासहजी घडलेले नाही. असंख्य क्रांतिकारकांच्या, हुतात्म्यांच्या, महापुरुषांच्या त्याग व बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याआधी सुमारे दीडशे वर्षे भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते. व्यापाराच्या नावाखाली आलेल्या इंग्रजांनी नंतर आपले पाय इथे रोवले व ते राज्यकर्ते बनले. त्यांनी आपल्या देशातील नागरिकांना गुलाम करून ठेवले होते. याचा महापुरुषांनी वेळोवेळी विरोध केला व आपापल्या परीने आवाज उठविला. या सामूहिक लढ्याला अखेर यश येऊन 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. आज आपला देश महासत्तेच्या दिशेन वाटचाल करतोय. जमीन ते अवकाशापर्यंतच्या विविध क्षेत्रांत तसेच भू, जल, वायू अशा सामरिक शक्तीमध्येही देशाने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. देशाला सन 2014पासून सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात लाभले आहे. त्यामुळेच ज्या भारताकडे पूर्वी हीनतेने पाहिले जात होते त्याच देशासाठी आज पायघड्या घातल्या जात आहेत. पंतप्रधान मोदी लोकाभिमुख व पारदर्शकतेने देशाचा कारभार पाहत आहेत. देशाभिमानी हेदेखील पंतप्रधान मोदींचे एक वैशिष्ट्य आहे. याची प्रतिची वारंवार आलेली आहे. देशावर शत्रूराष्ट्राकडून हल्ला झाल्यावर त्याला पंतप्रधानांच्या भक्कम पाठबळाने लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. देशासाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केले त्यांचे स्मरण कायम रहावे आणि नव्या पिढीमध्ये देशभावना जागृत व्हावी यासाठी पंतप्रधान मोदींनी माझी माती, माझा देश हे अभियान जाहीर केले. ते क्रांती दिन अर्थात 9 ऑगस्टपासून 14 ऑगस्टपर्यंत राबविले जात आहे. या अंतर्गत विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. यामध्ये स्वातंत्र्यवीर व सैनिक यांचा नामोल्लेख असलेले शिलाफलक उभारणे, पंच प्रण शपथ घेणे, वसुधा वंदन अंतर्गत देशी झाडांचे रोपण करणे आदींचा समावेश आहे. त्याला देशवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सर्वत्र हे उपक्रम राबविले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्ताने हे सर्व कार्यक्रम होत असताना गतवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील हर घर तिरंगा अभियान अर्थात घरोघरी राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन शासन-प्रशासनाने केले आहे. हल्ली सोशल मीडियाचा सर्वत्र बोलबाला आहे. हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या डीपीला राष्ट्रध्वज तिरंगा लावला असून नागरिकांनाही सोशल नेटवर्किंग साइट्सवरील प्रोफाइल पिक्चर बदलण्याचे सूचित केले आहे. आपण विविध सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करीत असतो. तशाच प्रकारे देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र साजरा व्हावा ही पंतप्रधान मोदींची उद्दात भावना आहे. यानिमित्ताने देशवासीयांनी एकजूट पहायला मिळेल. शिवाय जागतिक पातळीवर एक चांगला संदेशही जाणार आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply