Breaking News

राजकारणाचाच शाप

काही भीषण अपघातांमुळे लोकांच्या मनात समृद्धी महामार्गाविषयी गैरसमज निर्माण झाले असून विरोधकांनी केलेली बेजबाबदार विधाने त्यात भरच घालू शकतात. प्रत्यक्षात या महामार्गावरून प्रवास करण्याचा अनुभव घेतलेले लोक मात्र समृद्धी महामार्गावरील प्रवास सुखकर असल्याचेच सांगतात. महामार्गाच्या बांधणीत कुठलाही दोष नसून महामार्ग गुणवत्तापूर्ण असल्याची ग्वाही तज्ज्ञ जाणकारांनीही यापूर्वीच दिली आहे. आपल्या वाहनाचा प्रकार व वाहनाची प्रत्यक्ष स्थिती ओळखूनच येथील वेगमर्यादेनुसार प्रवास करणे अपेक्षित आहे.

समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चुकीच्या कारणासाठी चर्चेत आला असून शनिवारी मध्यरात्री या महामार्गावरील जांबरगाव टोल नाक्याजवळ घडलेल्या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा या महामार्गाविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. महामार्गावर शनिवारी टेम्पो ट्रॅव्हलरने भररस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने 12 जण जागीच ठार तर 23 जण जखमी झाले. अपघातग्रस्त टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक एकूण 35 प्रवासी होते. बुलढाण्यातील बाबा सैलानींच्या दर्शनाला हे सारे गेले होते व तेथून नाशिक जिल्ह्याकडे परतत होते. या अपघाताचे वृत्त येताच पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाची बांधणीच सदोष असल्याची चर्चा सुरू झाली तर दुसरीकडे काही आरटीओ अधिकार्‍यांनी महामार्गावर भररस्त्यात ट्रक अडवल्याने पाठीमागून येणारी टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकवर आदळून हा अपघात झाला असे दर्शवणारा व्हिडिओही व्हायरल झाला. अपघाताच्या काही वेळ आधीचा हा व्हिडिओ असून यात आरटीओ अधिकारी भररस्त्यात ट्रक थांबवून ट्रकचालकाची चौकशी करत होते असे आढळून आल्याचे सांगितले जाते. संबंधित दोन्ही आरटीओ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले असून त्यांना अटकही झाली आहे. चौकशीतून अपघात नेमका कसा झाला त्याचे अधिक तपशील समोर येतीलच, परंतु तुर्तास हाही अपघात मानवी चुकीतून झाल्याचे प्राथमिक माहितीतून दिसते आहे. ही अशी माहिती समोर येऊनही ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातावरून सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी दवडली नाही. समृद्धी महामार्ग शापित असून लोकांचा शाप त्याला लागला आहे अशी मुक्ताफळेही त्यांनी उधळली. समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी सरकारविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाविषयी ते इतक्या बेजबाबदारपणाने कसे काय बोलू शकतात हा प्रश्नच आहे. गेल्या डिसेंबरमध्ये 11 तारखेला या महामार्गाचे लोकार्पण झाले. महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा सुरू करण्यात आला असून शिर्डी ते मुंबई टप्प्याचे काम सुरू आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये या महामार्गावर सुमारे बाराशेच्या वर अपघात झाले आहेत व त्यात जवळपास दीडशे लोक मृत्यूमुखी पडले आहेत. येथे झालेले बहुतेक अपघात हे अतिशय वेगाने वाहन चालविणे, लेनची शिस्त न पाळणे, टायरमध्ये पुरेशी हवा नसणे वा टायरची स्थिती सुयोग्य नसणे यामुळे झालेले आहेत. वास्तविक सलग सरळ रेषेतील या महामार्गावरील प्रवासात योग्य वेग राखल्यास वाहनचालकासाठी आव्हानात्मक काहीही नाही, परंतु हा वेगच आपल्या वाहनाच्या स्थितीनुसार तसेच दिवस वा रात्र, तापमान, पाऊस आदींचा अंदाज घेऊन वाहनचालकाने सुयोग्य असा राखणे अपेक्षित आहे. अकारण महामार्गाच्या बांधणीत दोष शोधू पाहणार्‍यांनी संबंधित मानवी चुका लक्षात घेतल्यास या महामार्गाची नाहक होणारी बदनामी टळू शकेल.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply