Breaking News

सिनेतारकांचे देशप्रेम

कुणी कुणाचे समर्थन करावे यावर लोकशाहीत निर्बंध असण्याचे कारणच नाही. किंबहुना, घटनेने तसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. त्यात फिल्मी सितारे देखील आलेच. परंतु आपला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना वादग्रस्त विधाने करून पूर्वप्रसिद्धी बटोरण्याचे उद्योग अनेक फिल्मी कलावंत करत असतात. त्याची अनेक उदाहरणे नजीकच्या भूतकाळात आपण पाहिलेली आहेत.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मारहाणीचे प्रकरण देशभर अनेक ठिकाणी वाजत-गाजत राहिले आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जेएनयूच्या प्रांगणात घडलेल्या हिंसाचाराचा निषेध जोरदार पद्धतीने केला गेला. या निषेधाच्या लाटेत फक्त विद्यापीठांची आवारेच धुमसली नाहीत तर रस्तोरस्ती तरुणाईने आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. अशावेळी फिल्मी सितारे कशाकरिता मागे राहतील? आपापल्या सोयीने आणि तारखा सांभाळून चित्रपट कलावंत सामाजिक समस्यांवर अधूनमधून आपली मते प्रकट करत असतात. त्याच्या ताबडतोब प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असल्याने हमखास प्रसिद्धीचे हे एक तंत्रच झाले आहे. याची कितीतरी उदाहरणे देता येतील. तथापि जेएनयूतील हिंसाचाराच्या विरोधात मुंबईत झालेल्या काही निदर्शनांपैकी एक आंदोलन बांद्य्रातील पाली हिल येथेही घडले. ते अर्थातच डाव्या विचारसरणीच्या सिनेतार्‍यांचे होते. जेएनयू प्रकरणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तोंडसुख घेणे हाच त्यांचा लाडका कार्यक्रम पाली हिलच्या आंदोलनातही दिसून आला. अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विशाल भारद्वाज, झोया अख्तर, दिया मिर्झा या नेहमीच्या यशस्वी कलाकारांनी पाली हिलचे आंदोलन तडीला नेले. त्यातच भरीस भर म्हणून मंगळवारी संध्याकाळी प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पडुकोण थेट जेएनयूच्या आवारात पोहोचली आणि तेथे सुरू असलेल्या कन्हैया कुमारच्या पूर्वनियोजित निदर्शनात मूकपणे सहभागी झाली. दीपिका तेथे फक्त पाचसहा मिनिटेच उपस्थित होती व काहीही न बोलता निव्वळ उपस्थितीवजा पाठिंबा दर्शवून ती तेथून निघून गेली. दीपिकाने जेएनयूच्या आवारात लावलेल्या उपस्थितीचे पडसाद सोशल मीडियात तात्काळ उमटले. अनेकांनी तिच्या भूमिकेचे समर्थन केले, तर भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी तिच्यावर टीकेचे आसूड ओढले. सोशल मीडियावरील हे भांडण अखेर विकोपाला गेले. जेएनयूमधील दीपिकाची उपस्थिती आक्षेपार्ह मानण्याचे काहीच कारण नाही. दीपिका पडुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना केवळ पाच मिनिटे जेएनयूत उपस्थिती लावून तिने वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर विनासायास स्थान मिळवले. ही बाब अनेकांना खटकणारी वाटते. या चित्रपटाची दीपिका ही एक निर्माती आहे. ही बाब लक्षात घ्यायला हवी. जेएनयूमधील उपस्थिती दीपिकाने अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणाने लावलेली असेलही. परंतु अन्य फिल्मी कलावंतांनी पूर्वीच्या काळी वेळोवेळी केलेल्या पब्लिसिटी स्टंटमुळे सामान्य जनांच्या मनात संशयाचे धुके पसरले. कुठल्याही हिंसाचाराचे समर्थन करणे अनुचितच नव्हे तर गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. उलटपक्षी हिंसाचाराला केलेला मूक विरोध दीपिका पडुकोण हिने प्रामाणिकपणाने केलेला असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. प्रश्न एकट्या दीपिका पडुकोणचा नसून देशभर उद्भवलेल्या भ्रामक गैरसमजुतींचा फायदा राजकीय हितशत्रू उठवत असताना सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या प्रतिक्रियेने काय वादळ उद्भवू शकते याची जाणीव ठेवूनच प्रसिद्ध कलावंतांनी व्यक्त होणे अपेक्षित आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply