Breaking News

पेणमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मोठे मताधिक्य मिळेल -आमदार प्रवीण दरेकर

पेण : प्रतिनिधी
देशात भाजप व मित्र पक्षांचे मिळून 400 खासदार नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी संसदेत जातील. त्याचवेळी छत्रपतींच्या मातीतील रायगडचा मावळाही सुनील तटकरेंच्या रूपाने तिथे जाईल आणि तो पाठवण्याची जबाबदारी भाजप महायुतीने स्वीकारली आहे. पेण विधानसभा मतदारसंघात मतांची मोठी आघाडी महायुतीचे उमेदवार तटकरे यांना मिळेल, असा विश्वास भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि.3) पेण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर हे निरीक्षक म्हणून रायगड लोकसभा दौर्‍यावर असून त्यांच्या उपस्थितीत पेण विधानसभेतील लोकप्रतिनिधी आणि सुपर वॉरियर्स कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या पत्रकार परिषदेस आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशिल पाटील, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.
भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, भाजपच्या वतीने पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विशेष जबाबदारी देऊन ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे. या दौर्‍यात आढावा घेणे, आवश्यकतेनुसार कार्यकर्त्यांना सूचना करणे अशा प्रकारची भूमिका घेत, व्युहरचना करीत कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे असे आदेश देण्यात आले आहेत. उमेदवाराचे जोरात कामे करावे हा प्रमुख उद्देश आहे. या देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी होणार आहेत हेच आमचे ध्येय असून पूर्ण ताकदीने भाजपचे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचे काम करणार आहेत.
पेण विधानसभेचा ज्यानुसार आढावा घेतला त्यानुसार माझे ठाम मत झाले आहे की, या मतदारसंघात साधरणतः 75 हजार मतांची आघाडी महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांना मिळेल. हे मताधिक्य भाजपच्या कडवट कार्यकर्त्यांची मेहनत व योगदान मोठे असेल. यासाठी घटक पक्षातील कार्यकतही अतिशय जिद्दीने कामाला लागले आहेत, असे आमदार दरेकर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तुलनेत विरोधकांकडे नेता नाही. केंद्र, राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला आहे. विरोधकांकडे धोरण नाही. आमच्याकडे राष्ट्रभक्तीची भूमिका आहे. आमच्या महायुतीतील घटक पक्षांची जी शक्ती आहे त्यापुढे विरोधकांचा निभाव लागेल असे वाटत नाही. प्रचंड मताधिक्क्य रायगड लोकसभेतून महायुतीला मिळेल, असा दावा आमदार दरेकर यांनी केला.
आमदार रविशेठ पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाण्याच्या निधीसाठी 38 कोटी रुपये मंजूर केले होते. 80 टक्के कामे झाले आहे, तर सुमारे 700 ते 800 कोटी रुपये अडीच वर्षांत या सरकारने पेण तालुक्यासाठी दिले आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply