Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे महत्त्वपूर्ण निर्णय, योजना -खासदार श्रीरंग बारणे

कर्जतमध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात

कर्जत : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय, योजना आणलेल्या आहेत. ब्रिटिशकालीन कायद्यांचा सर्वसाधारण लोकांना त्रास होत होता. ते कायदे बदलण्याचे महत्त्वाचे कामही पंतप्रधान मोदींनी केले. ही निवडणूक देशाची आहे. देश कुणाच्या हातात सुरक्षित राहील? देशाचा कोण विकास करेल? तर हे मोदीजीच करू शकतात असा सर्वांना विश्वास आहे, असे प्रतिपादन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी शुक्रवारी (दि. 3) केले. ते कर्जतमध्ये आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा साईकृपा शेळके सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यास भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभापती नरेश पाटील, तानाजी चव्हाण, विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, दीपक बेहेरे, प्रकाश बिनेदार, रमेश मुंढे, मंगेश म्हसकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, वसंत भोईर, मंडल अध्यक्ष राजेश भगत, रासपचे जिल्हाध्यक्ष भगवान ढेबे, माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नरेश मसणे, शरद लाड, रजनी गायकवाड, खोपोली शहराध्यक्ष रमेश रेठरेकर, राजेंद्र येरुणकर, अशोक ओसवाल, तानाजी चव्हाण, कर्जत शहराध्यक्ष विजय जिनगरे, शर्वरी कांबळे, बिनीता घुमरे, अ‍ॅड. हृषिकेश जोशी, किसन सेल जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, नितीन कांदळगावकर, सूर्यकांत गुप्ता, स्नेहा गोगटे, अ‍ॅड. गायत्री परांजपे, पुष्पा दगडे, राहुल वैद्य, संजय
कराळे आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, विरोधक मी काय कामे केली असे विचारतात. त्यांना सांगतो कर्जतच्या तुंगीमध्ये स्वातंत्र्यापासून वीज नव्हती, रस्ता नव्हता. तेथे वीज नेली. रस्ता सुरू आहे. पनवेल-कर्जत रेल्वेचे काम 80 टक्के काम होत आले आहे. आठ पदरी रस्ता जेएनपीटीसाठी झाला. त्यामुळे कितीतरी पटीने कंटेनर त्यावरून जात आहेत.
या वर्षीची 22 जानेवारीची तारीख आठवा तो दिवस महत्त्वाचा आहे. पाचशे वर्षे तंबूत असलेल्या प्रभू श्रीरामांचे अयोध्येत भव्य दिव्य मंदिरात पंतप्रधान मोदींनी प्राणप्रतिष्ठा केली. देशातील 60 टक्के जनतेला बँक दारात उभी करीत नव्हती, मात्र मोदीजींनी बँकवाल्यांना सांगितले, तुम्ही आता त्यांच्या दारात जा. 40 कोटी जनतेची खाती उघडली गेली आणि कोविडमध्ये खातेदारांच्या नावावर पैसे पाठवता आले. आता राहुल गांधी म्हणतात शेतकर्‍यांच्या खात्यावर एक लाख रुपये टाकू, पण ती खाती मोदींनी काढली होती तसेच त्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा करणे सुरू केले. राहुलबाबांनी काँग्रेसच्या राज्यांमधील शेतकर्‍यांच्या खात्यात तरी 72 हजार रुपये द्यावेत, असे भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले.
माजी आमदार सुरेश लाड यांनी आपण पंचायत समिती विभागवार बैठका घेतल्या. त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पद्धतशीर बैठका सुरू आहेत. देश सुरक्षित आहे. परदेशातील भारतीयांना सन्मान मिळत आहे. कलम 370 हटवले. असे अनेक निर्णय मोदी सरकारने घेतल्याचे सांगितले.
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी म्हणाले की, आपण प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपची ताकद अनेक पटीने वाढली आहे. तरीही अधिकाधिक मते मिळविण्याचा प्रयत्न प्रत्येक कार्यकर्त्याने केले पाहिजे. त्यासाठी सक्रिय रहावे.
राजेश भगत यांनी विरोधकांकडे आरोप करायला काहीच मुद्दे नाहीत. सरकारचे काम 2047 सालचे व्हिजन ठेवून चालू आहे, असे म्हटले. अश्विनी पाटील यांनी आपण अबकी बार चारशे पारच्या घोषणा देत आहोत. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी असून महिलावर्ग प्रचारात पुढे आहे, असे सांगितले.
तानाजी चव्हाण म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. किरण ठाकरे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवायचे हे एकच काम विरोधकांचे आहे, पण ते काय करणार आहेत हे त्यांचे त्यांनाच माहीत नाही. काहीही झाले तरी मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. राज्य सरकारही आपलेच येईल, असा विश्वास व्यक्त केला. नरेश पाटील, दीपक बेहेरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नम्रता कांदळगावकर यांनी केले.
खासदार श्रीरंग बारणेंना निवडून द्या -आमदार प्रशांत ठाकूर
कोविडची भारतीय लस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली, म्हणून आपण वाचलो आहोत. मोदीजींनी मोफत धान्य दिले. गॅस सिलिंडर दिले. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी पाणी योजना सुरू आहेत. त्या लवकरच पूर्ण होतील. युद्ध थांबवून परदेशात असणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणले. पुढील पाच वर्षे मोफत रेशनिंग, सत्तर वर्षांच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी मोदीजी घेत आहेत. त्यांची गॅरेंटी आपल्याला माहीत आहे. त्यांचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून द्या, असे आवाहन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी भाषणात केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply