Breaking News

धूर्त चोर आणि चतुर पोलीस

’पोलीस अधिकार्‍यांची चोराला शोधण्याची टेक्निक कधी मदतीला येईल सांगता येत नाही. कारण सहा वर्षांपूर्वी टिटवाळा भागात चोरी करणारा चोर दोन वर्षे सजा भोगून नेरळला राहायला गेला आहे आणि तेथे दुकान टाकून धंदा करतोय अशी माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी नेरळमध्ये घडलेल्या अनेक चोर्‍यांबाबत नोंदवही चाळून पाहिली असता, चोर मोबाइल वापरत नाही आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यात येत नाही. असा हुशार चोर कोण असू शकतो, त्या वेळी टिटवाळा भागात अशाच प्रकारे चोर्‍या करणारा गौतम विलास माने याचे नाव समोर आले. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2017 पासून घरफोड्यांच्या घटना घडत आहेत. त्यात चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम लंपास केली जात होती. त्यामुळे नेरळ पोलिसांपुढे चोरीच्या घटनांबद्दल आव्हान निर्माण झाले होते, मात्र सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी नेरळ पोलीस ठाण्यात आल्यानंतर आपले सोर्स वापरून टिटवाळा येथील चोरीच्या घटनेतील आरोपी याचा शोध घेत असताना नेरळ पोलिसांना बेकरे येथील चोरीच्या घटनेत एक माहिती पुढे आली. त्यात नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2017 पासून आजवर छोट्या-मोठ्या चोर्‍या आणि घरफोड्यांच्या सत्राबाबत महत्त्वाची माहिती पुढे येणार होती. त्यातील नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस या सर्व गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी बेकरे येथे गेले. त्या वेळी चोराने केलेली एक चूक शोध कामात मदतीला आली. केवळ 850 रुपये चोरणार्‍या चोराने तो अट्टल आणि सराईत असल्याने चूकच ठेवली नव्हती.

बेकरे या गावात दीनानाथ मालू कराळे यांच्या घरात त्याने चोरी केली आणि तेथे असलेला मोबाइल नेण्यासाठी उचलला, पण त्या मोबाइल वर पॅटर्न लॉक होता. तो पॅटर्न खोलतो का हे त्या चोराने दोनदा प्रयत्न करून पाहिला आणि त्यात तो चोर अडकला. दीनानाथ कराळे यांच्या मुलाच्या त्या मोबाइलवर नवीन अ‍ॅप डाऊनलोड होता आणि त्यावर पॅटर्न हाताने करीत असताना आपोआप एक सेल्फी कॅमेर्‍यात बंदिस्त झाला, मात्र त्या चोरीच्या घटनेत 850 रुपयांची चोरी झाल्याने ती बाब कराळे यांच्याकडून लपवून ठेवली गेली होती. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने अखेर त्याला 10 नोव्हेंबर रोजी अटक केली. संबंधित इसमाचे नाव गौतम विलास माने असे आहे. माने याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला पोलिसी पाहुणचार दिल्यानंतर त्याने आतापर्यंत नेरळ परिसरात जिते, नेरळ-पाडा, भडवळ, उकरूळ, आंबिवली, पोशीर या गावात चोर्‍या, घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या सर्व ठिकाणाहून आजवर त्याने तब्बल 30 तोळे सोने चोरले होते. ते सोने चोरून त्याच्या लगडी बनवून त्याने ठेवल्या होत्या. रोख 3200 रुपयेही होते. ते सर्व पोलिसांनी जप्त केले, तसेच या वेळी पोलिसांना घरफोड्या करण्यासाठीची अवजारे देखील आरोपीच्या घरात मिळाली. तीदेखील त्यांनी ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आजवरचे एकूण सात गुन्हे उघड केले असून, आरोपीचा अजून कोणत्या गुन्ह्यात हात आहे का याचा नेरळ पोलीस तपास करीत आहेत.

नेरळ-कशेळे रस्त्यावर उसाचे गुर्‍हाळ चालवून व्यवसाय करण्याचा बहाणा माने करीत होता. त्या ठिकाणी त्याने कपड्याचे दुकानदेखील टाकले होते आणि आपल्या दुकानासाठी पैशाची गरज लागते म्हणून तो नेरळ आणि कर्जत येथे सोन्याचे दागिने ठेवून पैसे उचलायचा. दिवसभर दुकानात बसून तो लोकांना दिसायचा, त्यामुळे कोणाला तो चोर आहे असा संशय देखील येत नसे, मात्र दुपारी तो दुचाकीवर दुकानातून निघायचा आणि चोरी करण्याची घरे हेरून ठेवायचा. त्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत, अन्य रस्ते कोणते याची माहिती फिरून घ्यायचा आणि नंतर तो चोर्‍या करायचा. प्रत्येक वेळी तो शेतातून रस्ते काढत आपले सावज हेरायचा आणि चोर्‍या करून पुन्हा आपल्या घरी परत यायचा, मात्र चोरी करायला निघताना त्याच्याकडे कायम एक सॅक असायची, त्यात टाळे फोडण्याची हत्यारे असायची हे त्याला पकडल्यानंतर आता उघड झाले आहे.

पोलिसांनी त्या मोबाइलवरून सेल्फीत नोंद झालेल्या फोटोची प्रिंट मारून घेतली. त्याचा आधार घेत पोलिसांनी मग गेल्या दोन वर्षातल्या एकूण सात घरफोड्यांचा गुन्हा उघड झाला आहे. या घरफोड्या करून चोराने चोरलेले सोने लगड बनवून ठेवले होते. ते तब्बल 30 तोळे सोनेदेखील नेरळ पोलिसांनी जप्त केले आहे. मोबाइलच्या पॅटर्न लॉकमुळे हा चोर पोलिसांच्या हाती आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, आजवरच्या घरफोड्यांच्या गुन्ह्यात ही सगळ्यात मोठी कारवाई नेरळ पोलिसांनी केली. नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे एक पथक तयार केले. त्यात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, गिरीश भालचिम, सहाय्यक फौजदार गणेश गिरी, पोलीस हवालदार सुखदेवे, पोलीस नाईक नीलेश वाणी, शरद फरांदे, समीर भोईर, पोलीस शिपाई वैभव बारगजे यांचा या पथकात समावेश केला. या पथकाने मिळालेला फोटो घेऊन नेरळ व परिसर अक्षरशः पिंजून काढला. तेव्हा त्यांना नेरळ कोल्हारे चारफाटा येथे सादर फोटोच्या वर्णनाशी मिळतीजुळता व्यक्ती भेटला आणि नेरळ पोलीस आरोपीपर्यंत पोहचले.

-संतोष पेरणे

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply