ना. नितीन गडकरींचे चौकच्या सभेत प्रतिपादन
चौक : प्रतिनिधी
मावळ लोकसभा मतदार संघाच्या विकासात खासदार श्रीरंग बारणे यांचा सिंहाचा वाटा असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही आणि रामराज्य आणणार, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डबल इंजिनमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग तिप्पट झाला आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची जाहीर सभा खालापूर तालुक्यातील चौक येथे झाली, त्यावेळी तुफान गर्दीत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी व्यासपीठावर शिवसेना नेते गजानन किर्तीकर, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार देवेंद्र साटम, सुरेश लाड, ज्येष्ठ नेते अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर, रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, सरपंच रितू ठोंबरे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला देशात शिवशाही व रामराज्य आणायचे आहे, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेले काम हा फक्त ट्रेलर होता, खरा चित्रपट तर अजून सुरू व्हायचा आहे, असेही ना. गडकरी या वेळी म्हणाले. प्रत्येकाला घर, गावागावात पाणी, शाळा, दवाखाना, रस्ता, वीज, शेतीमालाला भाव व रोजगार हे आमचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशाला भय, भूक, दहशतवाद व भ्रष्टाचार यापासून मुक्त करायचे आहे. या देशात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही आणि प्रभू रामचंद्रांचे रामराज्य आणण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यासाठी मावळच्या मतदारांनी धनुष्य बाणचे बटण दाबून श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहनही ना. गडकरी यांनी या वेळी केले.
आमदार महेश बालदी यांनी, आपल्या प्रास्ताविकात उरण तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांचा आढावा सादर केला. खासदार बारणे यांना उरण तालुक्यातून 40 ते 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले. चौकच्या प्रथम नागरिक रितू सुधीर ठोंबरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत केले.