नवी मुंबई ः प्रतिनिधी
जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एकदिवसीय रायगड किल्ल्याच्या अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या संकटातही दैनंदिन क्षणाक्षणाला घडणार्या घडामोडींचा वेध घेणार्या पत्रकार मंडळींनी या वेळी थोडीशी उसंत घेत सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत लपलेल्या महाराजांच्या रायगड किल्ल्याला भेट देऊन इतिहासाची पाने चाळली.
एसी मिनी बसने प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी फोनवरून संपर्क साधत पत्रकारांना सुखकर प्रवासासाठी आणि अभ्यास दौर्यातून काही नवीन शिकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मन प्रफुल्लीत करणार्या भक्तिगीतांनी प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर बाल शिवाजी, जय जय महाराष्ट्र माझा, अशा गीतांनी रायगडाकडे 23 पत्रकारांनी आगेकूच केली. प्रवासादरम्यान अनेकांनी महाराष्ट्राच्या विविध कला-संस्कृती, परंपरेचा आणि आपल्याला आलेले अनुभव चर्चेतून मांडले. उंच डोंगर, नागमोडी वाटा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि मनात एक उत्सुकता घेऊन महाराजांच्या रायगड किल्ल्यावर सर्व पत्रकार दाखल झाले.
सुमारे 820 मीटर उंच आणि 2700 फूट उंचीच्या गिरिदुर्ग प्रकारातील शत्रूला तर सोडाच मुंगीलादेखील प्रवेश करता येणार नाही अशा अभेद्य रायगड किल्लावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. अभेद्य चिरेबंदी असा रायगड किल्ला सहज सर करणे शक्य नसल्याने त्या ठिकाणी हिरकणी टोकावरून गडाकडे जाण्यासाठी स्वर्गीय जोग यांच्या माध्यमातून साकारलेल्या रोप वेचा आधार घेण्यात आला. पायथ्यापासून सुरू झालेला रोप वे सात मिनिटांतच गडावर घेऊन गेला. किल्ल्याचा विस्तृतपणे आढावा घेता यावा याकरिता किल्ले रायगडचे अभ्यासक रमेश औकिरकर यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली.
भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटनेचा साक्षीदार असलेल्या शिवराज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर झाला आणि तोच किल्ला पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल पत्रकारांनी समाधान व्यक्त केले. किल्ल्यावर असणारे प्रवेशद्वार, दगडी बांधकाम, महाराजांच्या आठ पत्नींचे निवासस्थान, महादरवाजा, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, मेना दरवाजा, राजभवन, नगारखाना, बाजारपेठ, वाघ दरवाजा, टाकसाळ, टकमक टोक, जगदिश्वर मंदिर, महाराजांची समाधी अशा 22 स्थळांचा पत्रकारांनी आढावा घेतला.
रायगडचा किल्ला धर्मरक्षणासाठी जतन करणे आवश्यक असून प्रत्येकाने या किल्ल्याला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन पत्रकारांनी या वेळी केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्तंभाला सर्वांनी डोके टेकवून नतमस्तक होत मानाचा मुजरा केला अन् नवी मुंबईकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. अभ्यास दौर्यात सहभागी होऊन दौरा यशस्वी करणार्या पत्रकारांचे जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शेशवरे यांनी आभार मानले.