नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी ठणकावले
पेण ः प्रतिनिधी
ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, त्यासाठी शेकडो गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, असे उद्गार नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत काढले. 16 तारखेला पेण न. प.च्या स्थायी समितीच्या सभेत गटनेते व मुख्याधिकारी यांच्यात शहरातील एका अनधिकृत बांधकामाबाबत शाब्दिक बाचाबाची झाली होती. याचा राग मनात ठेवून मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, ज्या अनधिकृत बांधकामाबाबत जनतेच्या तक्रारी येत होत्या त्या प्रशासनाकडे मांडून सोडविण्याचे काम लोकप्रतिनिधी करीत असतात, परंतु प्रशासनातील अधिकार्यांनी या समस्या सोडविण्याऐवजी लोकप्रतिनिधींच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या तर नागरिकांच्या समस्या सुटणार कशा, असा सवालही या वेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी उपस्थित केला.
पेणमधील अनधिकृत बांधकामाबाबत तेथील स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्याने मी मुख्याधिकार्यांना नोटीस देण्यास सांगूनसुद्धा प्रशासनातील अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने हा विषय स्थायी समितीत घेऊन त्याच्यावर उपाययोजना करण्यास सांगितले, परंतु मुख्याधिकर्यांनी संबंधितांना नोटीस देण्यास नकार देऊन उलटसुलट उत्तरे दिल्याने गटनेते व मुख्याधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याचे विरोधक राजकारण करीत असून ज्यांच्यावर पेण अर्बन बँक घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांनी कायम पेण शहरातील जनतेशी राजकारण केले अशा लोकांनी कितीही मोर्चे व कितीही आंदोलने केली तरी जनता अशा लोकांना भुलणार नाही, असे नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष वैशाली कडू, बांधकाम सभापती राजेश म्हात्रे, नगरसेविका अश्विनी शहा, नगरसेवक दर्शन बाफना, प्रशांत ओक आदी उपस्थित होते. शेवटी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या प्रोसिडिंगमध्ये पालिकेच्या कर्मचार्यांना जाणूनबुजून खाडाखोड करायला भाग पाडल्याचा आरोप मुख्याधिकार्यांवर करून याबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. कर्मचार्यांवर दबाव आणून प्रोसिडिंगमध्ये अदलाबदल करण्यास भाग पडणार्या दोन्ही पालिका कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी पेण आणि पेण पोलीस ठाण्यात मुख्याधिकार्यांविरोधात अर्ज दाखल केला आहे, असेही नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी या वेळी सांगितले.