देव आनंदचं पाहणं/ऐकणं/असणं/हसणं/बोलणं/सांगणं/गाणं यात प्रेमाचा मुरंबा/लोणचं/पिझ्झा असं काही भरलयं की हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर प्रेम पाहताना/ऐकताना पहावे ते फक्त आणि फक्त देव आनंदला…
पलभर के लिए कोई हमे प्यार करले अशी विनवणी असो की दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो रे असो, त्याने रूपेरी पडद्यावर साकारलेले कोणतेही प्रेम गीत असो, ते आठवताच आपण ते गुणगुणायला लागतो ते गाणे देव आनंदच्या छोट्या छोट्या प्रेमाच्या लकबीसह डोळ्यासमोर येतेच. रसिकांच्या किमान तीन पिढ्या देव आनंदच्या प्रेम शैलीवर लट्टू होत्या. त्याच्या चालण्यात प्रेम (यह दिल ना होता बेचारा), त्याच्या प्रेयसीच्या छेडछाडीत प्रेम (छोड दो आंचल जमाना क्या कहेगा…इन अदाओ पे).
प्रेम ही त्याची अभिनेता म्हणून पहिली आणि कायमची ओळख. त्याशिवाय त्याने भावनिक क्षण (गाईड), समजदार पती (तेरे मेरे सपने), पिस्तूलधारी नायक (जॉनी मेरा नाम), ढिश्यूम ढिश्यूम हीरो (अमीर गरीब) असे बरेच काही केले, पण त्याचा प्रेमाचा परिपाक अतिशय उत्फूर्त. तिचं त्याच्या यशाची हेडलाईन. अनेक नायिकांसोबत त्याने पडद्यावर रोमान्स केला, त्याही देव आनंदसोबतच्या प्रेम दृश्यात हा तर अभिनय आहे हेच विसरल्या असतील. पडद्यापलिकडेही त्याची रंगलेली प्रेम प्रकरणे आजही रंगवून, खुलवून सांगितली जातात. अर्थात, सुरय्या व त्याच्या प्रेम प्रकरणाच्या गोष्टी अनेक. (त्यावरच एकादा चित्रपट काढावा असे अजूनही कोणाला का बरे वाटले नसेल? भरपूर नाट्य आहे यात.)
असा प्रेम पुजारीच्याच प्रगती पुस्तकातील सर्वात कमी गुण मिळाल्याने अनुत्तीर्ण झालेला चित्रपट चक्क प्रेमपट असावा? इश्क इश्क इश्क हा देव आनंदचा सर्वाधिक अपयशी चित्रपट. पडद्यावर येतोय तोच त्याला रसिकांनी पूर्णपणे नाकारले.
ही गोष्ट घडली, गुरुवार 14 नोव्हेंबर 1974 रोजी. त्या दिवशी हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. त्या अपयशाला पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखील. खुद्द देव आनंदचे भक्तही या चित्रपटाच्या आसपास गेले नाहीत.
दक्षिण मुंबईतील मेट्रो या चित्रपटगृहात गुरुवारी नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रथा आहे आणि जवळपास प्रत्येक चित्रपट निर्माता व दिग्दर्शकाला मेन थिएटरच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक रिपोर्ट काय आहे, त्यांना आवडला की नाही याचं भारी कुतूहल, उत्सुकता, तणाव असे. (ही पूर्वीची हुकमी गोष्ट. आता नवीन चित्रपट प्रदर्शित होतोय नि कोणी पाहतोय न पाहतोय त्याने किती कोटी कमावले याच्या बातम्या. चित्रपटाला विक्री मूल्य आल्यावर रसिक प्रेक्षकांना काय वाटतेय हे फार कोणी सिनेमावाला जाणून घेत असेल असे वाटत नाही.)
’इश्क इश्क इश्क’ प्रदर्शनाच्या दिवसाचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. फर्स्ट शोसाठीचा चित्रपट रसिक उत्साहाने मेट्रो चित्रपटगृहात येत आहेत असा देव आनंदला त्याच्या सांताक्रूझ पश्चिमेकडील खिरा हाऊस येथील कार्यालयात वितरकाचा फोन येताच तो सुखावला आणि ते स्वाभाविकच होते. प्रेम पुजारी (1970)पासून चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकल्यावर देव आनंदला हरे राम हरे कृष्ण (1972)च्या दिग्दर्शनात रौप्य महोत्सवी यश प्राप्त झाले. (मुंबईत गंगा चित्रपटगृहात या चित्रपटाने खणखणीत पंचवीस आठवड्यांचा मुक्काम केला)… तसे यश हीरा पन्ना (1973)ला मिळाले नाही. हीरा पन्नाच्या ट्रायल खूप झाल्या तरी वितरक मिळत नसल्याने नवकेतन फिल्म अशा नावानेच चित्रपट वितरण केले. त्या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही म्हणून देव आनंद गोंधळला, निराश झाला असे अजिबात नाही. तो त्याचा स्वभाव नव्हता. निराश देव आनंद ही त्याची अजिबात ओळख नव्हती. अधिक उत्साहात त्याने नेपाळला जाऊन इश्क इश्क इश्कची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. चित्रपटाचे नाव त्याच्या प्रतिमेला (इमेज) साजेसे.
मेट्रोतील पहिला खेळ संपल्यावर अतिशय निराश होऊन बाहेर पडत असलेल्या रसिकांचे चेहरे, कुजबुज यातून पब्लिक रिपोर्ट स्पष्ट होता (तो मध्यंतरलाच लक्षात आला होता आणि पडद्यावर गाणे सुरू होताच चहापान, सिगारेट, टॉयलेट यासाठी बाहेर पडत असलेल्या रसिकांवरून शिक्कामोर्तब होत होता. पूर्वी पिक्चरमध्ये किती दम आहे अथवा नाही हे अशा गोष्टीतून सुचित होत असे. चित्रपटाच्या दुनिया अशाच अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून गुंफलीय.)
…शो सुटलाय या अंदाजानुसार नवकेतन फिल्मच्या कार्यालयातील फोन वाजण्याची देव आनंदची प्रतीक्षा ट्रिंग ट्रिंग या घंटेने संपली… पलीकडून वितरक जे सांगत होता त्यावरून देव आनंद अधिकाधिक निराश होत होत गेला. त्याचा हा सर्वाधिक बजेटचा आणि मेहनतीचा हा चित्रपट होता. आपला चित्रपट रसिकांना अजिबात आवडलेला नाही, फ्लॉप झाला आहे हे देव आनंदला समजले होते, उमजले होते. काही क्षण तो बैचेन राहिला, चेहर्यावरचे भाव उतरले, तो अस्वस्थ झाला… पण, पण… आपल्या ऑफिसबाहेर येत आपल्या सहकार्यांना नेहमीच्याच अतिशय उत्साहात म्हणाला, माझ्याकडे आपल्या नवीन चित्रपटाची पटकथा तयार आहे. आपण लवकरच आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा करतोय आणि मेहबूब स्टुडिओत मुहूर्त करतोय…
देव आनंद कायमच म्हणायचा, मी मागे वळून पाहत नाही. मी चित्रपटाच्या यशापयशात अडकून पडत नाही हे त्याचे म्हणणे असे खरे ठरते. त्याने देस परदेसच्या निर्मिती व दिग्दर्शनाला सुरुवात केलीदेखील.
…न आवडावे असे इश्क इश्क इश्कमध्ये होते तरी काय? लहानपणापासून गीत संगीताची आवड असलेल्या धूनची (देव आनंद)च्या प्रेमाची ही गोष्ट. नेपाळमधील डोंगरमाथ्यावर घडते. धून कलिप्लोंग शाळेत संगीत शिक्षक आहे. त्याचे व पम्मी शबाना आझमी) यांच्या प्रेमाचे रुपांतर तिच्या नातेवाईकांच्या विरोधामुळे लग्नात होत नाही. म्हणून तो निराश होऊन नवीन आयुष्य जगण्यासाठी नेपाळमधीलच मठ येथे जातो. तेथे पहाड (प्रेमनाथ) याच्या हॉटेलमध्ये तो राहतो. पहाड हा सदैव दारू पिण्यात आनंद घेणारा. त्याला सहा मुली असतात त्यातील पूजा (झीनत अमान) हिच्याशी झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होते. गीत संगीत नृत्य होते आणि ते लग्न करणार तोच त्यांचे जवळचे नाते आहे असे दिसून येते. प्रत्यक्षात तसे नसते आणि मग क्लायमॅक्सला त्यांचे लग्न होते.
गोष्टीत नाट्य नाही म्हणून पटकथेत ते नाही आणि तसे नाही म्हणून दिग्दर्शनही सरधोपट. असा चित्रपट पडायला वेळ तो काय लागतोय. देव आनंद व शबाना आझमी अशीही रोमॅन्टीक जोडी असू शकते? शोभू शकते? तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील हा चित्रपट. देव आनंद व झीनत अमान यांच्या पडद्यावरच्या व पडद्यामागच्या नातेसंबंधांवर गॉसिप्स मॅगझिनमधून बरेच काही चमचमीत लिहीले गेले. देव आनंदच्या दिग्दर्शनातील चित्रपटावर एक प्रकारचा पाश्चात्यपणा दिसतो, त्यात झीनत अमान एकदम फिट्ट. ती देव आनंदमधील दिग्दर्शकापेक्षा त्याचं देव आनंदपण असण्यावर ती जास्त फिदा असावी असे या जोडीच्या चित्रपटात दिसते. मग तो चित्रपट प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित वॉरंट असू शकतो आणि बी. आर. इशारा दिग्दर्शित प्रेम शास्त्र असू शकतो, अगदी डार्लिंग डार्लिंग व कलाबाजही असू शकतो.
इश्क इश्क इश्कसाठी देव आनंदने भरपूर मेहनत घेतली. देव आनंदला एक चांगली सवय होती. कोणत्याही चित्रपटांच्या बाह्यचित्रीकरण स्थळी गेल्यावर शूटिंग संपल्यावर वा आपलं शूटिंग नसेल त्या दिवशी एक पेन व डायरी घेऊन फिरायला जायचे. त्यात काय काय पाहतोय, कोण कोण भेटतोय हे लिहून ठेवायचे. त्यातून होत असलेल्या ओळखीचा त्याला फायदा होई. हरे राम हरे कृष्णच्या वेळच्या भटकंतीत त्याला इश्क इश्क इश्कसाठीची शूटिंग स्थळे गवसली. तेवढ्यावरच शांत राहिल तो देव आनंद कसला? त्याने हेलिकॉप्टरमधून फिरुन नेपाळमधील दूरवरच्या डोंगरमाथ्यावरील स्थळे हेरली. छायाचित्रणकार फली
मिस्री यांचीही नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी होती. चित्रीकरण स्थळाचा विचार करुन शंभर जणांचे युनिट नेले. कलाकारही भरपूर होते. स्वत: देव आनंद
आणि जोडीला झीनत अमान, कबीर बेदी, प्रेमनाथ, नादिरा, जीवन,इफ्तेखार, शबाना आझमी, झरीना वहाब, कोमिला विर्क, सत्यजित,त्रिलोक कपूर, सुधीर, नाना पळशीकर, ए. के. हनगल, जानकीदास. यात देव आनंदने आपला लंडन येथे सी. ए. असलेला भाचा शेखर कपूरलाही बोलावले. त्याचा हा पहिलाच चित्रपट. भूमिका मात्र किरकोळ. म्हणजेच त्याच्याही कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत.
चित्रपटाची जमेची बाजू एकच. आनंद बक्षी यांच्या गीतांना राहुल देव बर्मनचे संगीत. अच्छे बच्चे नहीं रोते है (पार्श्वगायक किशोरकुमार), मुझको अगर इजाज़त हो तो (किशोरकुमार), टिमटिम चमका झिलमिल तारा (आशा भोसले व किशोरकुमार), वल्लाह क्या नजारा है (आशा भोसले, किशोरकुमार व सुषमा श्रेष्ठ) ही गाणी लोकप्रिय ठरली. त्या काळात रिदम हाऊसमध्ये लॉन्ग प्ले तबकडी आली, रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमालामध्ये नवीन गाणे आले की नवीन चित्रपट प्रदर्शनास
सज्ज होतोय याचा जणू सिग्नल मिळे. देव आनंदच्या चित्रपटातील गाणी नक्कीच चांगली असणार यावर विश्वास होता (तो कालांतराने कायमचाच गेला). राहुल देव बर्मनचा तर हा सुगाचा काळ होता. इश्क इश्क इश्कची गाणी लोकप्रिय होत गेली, पण चित्रपटाला ती कधीच वाचवू शकली नाहीत. देव आनंदची भूमिका असलेले अमरजीत दिग्दर्शित तीन देविया व गॅम्बलर, शंकर मुखर्जी दिग्दर्शित महल, विजय आनंद दिग्दर्शित तेरे मेरे सपने, खुद्द देव आनंद दिग्दर्शित प्रेम पुजारी यांना फर्स्ट रनला गल्ला पेटीवर यश मिळाले नाही, मात्र गाणी लोकप्रिय असल्यानेच ते चित्रपट मॅटीनी शोला वा रिपीट रनला आल्यावर त्याच गाण्यांमुळे ते हाऊसफुल्ल होत. इश्क इश्क इश्कबद्दल तेही झाले नाही.
अरेरे, ज्याच्या रोमारोमात रोमान्स भरला होता, त्या देव आनंदचा प्रेमभरा असा इश्क इश्क इश्क सर्वाधिक फ्लॉप चित्रपट ठरावा? या चित्रपटात देव आनंदचं मन का रमले नसेल? त्याचं दिग्दर्शक अगदीच सपक का बरे झाले असेल?
जे झाले त्याला पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखील, मात्र संगीतकार आर. डी. बर्मनमुळे या चित्रपटाचं अस्तित्व कायम राहिले. मुझको अगर इजाज़त होतो तो प्रेम का गीत सुनावू… देव आनंद प्रेम शैलीतील किशोरकुमारचे पार्श्वगायन. हे गाणे कितीही वेळा ऐकावे, पहावे, आठवावे, गुणगुणावे देव आनंदची प्रेमिक प्रतिमा डोळ्यासमोर येतेच तर मग आणखी काय हवे?
- दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक