गव्हाण ः वार्ताहर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कमालीचे ग्रंथप्रेमी होते. ग्रंथांसाठी घर बांधणारे महामानव होते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत जुनिअर कॉलेज मध्ये परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी बोलताना सांस्कृतिक विभाग प्रमुख व रयतच्या लाईफवर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितोद्धाराबरोबरच स्री-शिक्षणासाठी व नोकरदार महिलांना प्रसुतीनंतर रजेची तरतूद आदी महत्त्वाचे कार्य केल्याचे नमूद केले.विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील तथा तिर्थरूप अण्णा ह्या महामानवांच्या भेटीचा उल्लेख करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर याप्रसंगी बोलताना म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची दखल अवघ्या विश्वाने घेतली.विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य आणि रयत को- ऑप. बँकेचे संचालक प्रमोद कोळी, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, विद्यालयाचे उपशिक्षक सागर रंधवे तसेच उपशिक्षिका द्रोपदी वर्तक व चारुशीला ठाकूर, लेखनिक चंद्रकांत मढवी व दयानंद खारकर आदी उपस्थित होते.