Breaking News

पनवेलमध्ये रामेश्वर मंदिरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री रामेश्वर देवस्थान आणि जाणीव एक सामाजिक संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि.15) सायंकाळी दिपोत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होत पूजन केले.
भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे. त्यानुसार त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पनवेल मधील वडाळे तलावाजवळील प्राचीन रामेश्वर देवस्थानात शुक्रवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला.
त्रिपुरारीं पौर्णिमेला भगवान शंकराने अखंड भूमीवरून जनतेला त्रास देणार्‍या त्रिपुर राक्षसाच्या तीन पुत्रांचा वध केला म्हणून त्रिपुर अरी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात, त्याचेच औचित्य साधून रामेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकरापुढे आरती आणि त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करण्यात आला. याचे आयोजन जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील आणि मंदिराचे अध्यक्ष उमेश इनामदार यांनी केले होते.
या वेळी गोव्याचे माजी आमदार दयानंद सोपटे, पनवेल महापलिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, प्रसाद हनुमंते यांच्यासह मंदिराचे विश्वस्त, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply