Breaking News

नमक हराम 51 वर्ष

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है….

हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित नमक हराम हा माझा राजेश खन्नाच्या आवडत्या पाच चित्रपटातील एक. यश चोप्रा दिग्दर्शित इत्तेफाक, शक्ती सामंता दिग्दर्शित आराधना, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद आणि मोहनकुमार दिग्दर्शित अवतार हे माझे राजेश खन्नाचे आणखी आवडते चित्रपट. (ही हिट लिस्ट दहापर्यंत सहज जातेय.)

अमिताभ बच्चनच्या माझ्या आवडत्या पाच चित्रपटात मी ‘नमक हराम’चा खास उल्लेख करतोच. प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजीर व शराबी, रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले, मनमोहन देसाई दिग्दर्शित अमर अकबर अ‍ॅन्थनी हे माझे अमिताभचे टॉप फाईव्हमधील चित्रपट. ही हिट लिस्ट दहाच्याही अगदी सहज पुढे जाईल. आपण वयाच्या कोणत्या काळात चित्रपट पाहतोय, तेव्हाचा आपल्यावरचा चित्रपटाचा प्रभाव, आपली चित्रपटाबाबतची समज यात अनेक गोष्टी समाविष्ट असतात.
’नमक हराम’ मी शालेय वयात असताना पाहिला. राजेश खन्नाच्या क्रेझने मंतरलेले ते दिवस. एक प्रकारचा तो हिस्टेरिया होता. अशातच जंजीर आला. 11 मे 1973 रोजी तो प्रदर्शित होईपर्यंत हिंदी चित्रपटाचा वेगळा इतिहास लिहायची सुरुवात होईल असे कोणीही भविष्य वर्तवले नव्हते. मगर होनी को कौन टाल सकता है? सलिम जावेद लिखित पटकथा व संवाद आणि प्रकाश मेहराचे दिग्दर्शन असलेला जंजीर एक सर्वसाधारण मसालेदार मनोरंजक चित्रपट म्हणून प्रदर्शित झाला. मला आठवतंय डॉ. भडकमकर मार्गावरील इंपिरियल थिएटरमध्ये ‘जंजीर’ लागला आणि फर्स्ट शोपासूनच पब्लिकने अक्षरश: डोक्यावर घेतला. अ‍ॅन्ग्री यंग मॅन अर्थात सूडनायकाचे पर्व सुरू झाले. अमिताभच्या बाजूने वातावरण निर्माण होत गेले. त्याने राजेश खन्नाच्या यश चोप्रा दिग्दर्शित ‘दाग’च्या (मुंबईत रिलीज 27 एप्रिल 1973) यशाचे वातावरण झाकोळून टाकले… अमिताभचे हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित अभिमान (रिलीज 27 जुलै 1973), सुधेन्दू रॉय दिग्दर्शित ‘सौदागर’ (26 ऑक्टोबर 1973) यापाठोपाठ नमक हराम आला. (रिलीज 23 नोव्हेंबर 1973. एकावन्न वर्ष पूर्ण झालीदेखील).
राजेश खन्नावरील प्रेमाखातर नॉव्हेल्टी चित्रपटगृहावर स्टॉलच्या दोन रुपये वीस पैसे तिकीटासाठी चक्क दीड तासापासून रांगेत उभे राहून हाती आलेले तिकीट घट्ट धरुन आत गेलो… चित्रपट जस जसा पुढे सरकू लागला तसा अमिताभही आवडू लागला… कौन है वो माय का लाल असे म्हणतच त्याचा जो उद्रेक झाला, संताप बाहेर पडला तोच हाऊसफुल्ल गर्दीतून प्रचंड टाळ्याच टाळ्या आणि शिट्ट्या…
’नमक हराम’ आणखी एका गोष्टीसाठी आवडला. ती म्हणजे मैत्रीची गोष्ट. त्या काळात समाजात निखळ, निरपेक्ष मैत्रीचे नाते ही स्वाभाविक गोष्ट होती. त्या नात्यात त्या काळात व्यवहार नव्हता. खरंतर मैत्रीची गोष्ट आणि चित्रपट यांचे नाते अतिशय घट्ट आणि विविध पद्धतीचे… पिक्चरच्या नावातून असो (दो यार, दोस्त, दोस्ताना, यार मेरा), थीममधून असो (दोस्ती, संगम, सागर, दिल चाहता है, जिंदगी मिलेगी ना दोबारा, आदमी सडक का, छीछोरे वगैरे अनेक), संवादातून असो (सिगारेट और दोस्त दोनों फिल्टर होना चाहिए. चित्रपट एक चालीस की आखरी लोकल), गाण्यातून असो (तेरी दोस्ती मेरा प्यार, यह दोस्ती हम नहीं तोडेंगे, यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी)… यात एक हुकमी फंडा दोन मित्र एकाच युवतीच्या प्रेमात पडतात आणि मग ’दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा’ (संगम) अथवा बस मेरे यार है, बाकी बेकार है जिसके बदलेमे कोई तो प्यार दे (सागर). रसिकांना हे प्रेम त्रिकोण आवडले. त्यात कुतूहल व उत्सुकताही होती.
’थ्री इडियट्स’ या सगळ्यात पूर्ण वेगळाच. मैत्री कशीही असू शकते हे या चित्रपटातून अधोरेखित होतेय.
या सगळ्या मैत्री प्रवासात हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ’नमक हराम’मधील मैत्री पूर्णपणे वेगळी. आपल्या वडिलांच्या (ओम शिवपुरी) आजारात विकी (अमिताभ बच्चन) कारखाना सांभाळत असताना कामगार नेते बिपीन लाल (ए.के. हनगल) यांची त्याला एका प्रकरणात माफी मागावी लागते याचा बदला घेण्याच्या विकीच्या वृत्तीत त्याचा अतिशय जिवलग मित्र सोमू (राजेश खन्ना) मदत करण्यासाठीच चंदर नाव धारण करून त्याच ठिकाणी नोकरीला लागतो, पण कामगारांची सुख, दुःख, तणाव पाहून चंदरमधील माणुसकी जागी राहते आणि तो विकीची समजून घालण्याचा प्रयत्न करतो. ते विकीच्या पित्याला आवडत नाहीत म्हणून ते कूटनीतीने चंदरचे बिंग कामगारांसमोरच फोडतात. त्यामुळेच खवळलेले कामगार चिडून जाऊन चंदरला बेदम मारहाण करतात. हे प्रकरण इतके आणि असे वाढते की मालकच चंदरचा अपघाती मृत्यू घडवून आणणात आणि आपल्यामुळेच आपल्या मित्राचे निधन झाले असे मानत विकी शिक्षा भोगतो…) चित्रपट फ्लॅशबॅकने सुरू होतो. हृषिकेश मुखर्जी, गुलजार यांच्या दिग्दर्शनीय वैशिष्ट्यात फ्लॅशबॅक खूपच महत्त्वाची गोष्ट असे.) चित्रपटात रेखा, सिमी गरेवाल, दुर्गा खोटे, ए.के. हनगल, ओम शिवपुरी, असरानी, मनमोहन, मंजू, जयश्री टी. रझा मुराद (आलमच्या भूमिकेत)
इत्यादींवर भूमिका. मैत्रीतील त्याग असा निःस्वार्थी वृत्तीचा आणि अशातच सोमू विकीला उद्देशून गाणे गातो, दिये जलते है फूल खिलते है, बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है…. माझ्याप्रमाणेच अनेकांचे तरी हे अतिशय आवडते गाणे आहे. आनंद बक्षी यांच्या गीताना राहुल देव बर्मनचे संगीत. दिये जलते है, मै शायर बदनाम, नदीया से दरीया (सर्व किशोरकुमार) ही गाणी आजही लोकप्रिय. एका प्रसंगात सोमू विकीला म्हणतो, जहा यार नहीं वहा प्यार नही, जहा प्यार नही वहा यार नहीं. (त्या काळात चित्रपटातील असे टाळीबाज डायलॉग एक वेगळीच संस्कृती होती. चित्रपट हे दृश्य माध्यम असले तरी आपल्या देशातील पब्लिकला कायमच क्या डायलॉग मारा यार हा फंडा महत्त्वाचा वाटला. गुलजार यांची संवाद संस्कृती वेगळी, त्यात साहित्यिक स्पर्श आणि सलिम जावेदची खूप वेगळी. कादर खानचे डायलॉग म्हणजे बब्बईय्या हिंदी…
दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी आशयघन स्वच्छ मनोरंजक चित्रपटासाठी ओळखले गेले. आपले चित्रपट सहकुटुंब सहपरीवार पाहिले जातात याचे त्या काळातील दिग्दर्शक भान ठेवत. मुसाफिर, अनाडी, असली नकली, सत्यकाम, आशीर्वाद, आनंद, गुड्डी, अभिमान, मिली, अर्जुन पंडित, गोलमाल, जुर्माना, नौकरी, आलाप, खुबसुरत, झूठ बोले कव्वा कांटे इत्यादी चित्रपटातून त्यांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल जपली. आपली स्पेस निर्माण केली. त्यांचा स्वतःचा आपला हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला. ते स्वत: संकलकही असल्याने त्यांच्या दिग्दर्शनीय मांडणीत एक विशिष्ट लय असे. अमिताभ व जया बच्चन यांच्यावर त्यांचे खास प्रेम. ’नमक हराम’मध्ये विकीची भूमिका साकारताना अमिताभने त्यांचा आपल्यावरचा विश्वास साध्य केल्याचे दिसले. हा चित्रपट प्रदर्शित होताच यातील अभिनयावरुन राजेश खन्ना श्रेष्ठ की अमिताभ यावरुन चित्रपट साप्ताहिके, मासिकांतून भरपूर लिहिले गेले आणि या दोघांच्या फॅन्समध्येही जुंपायची हे विशेष. साप्ताहिक रसरंगमध्ये वाचकांच्या पत्राच्या सदरात अनेक आठवडे यावर उलटसुलट बरेच लिहिले गेले. ’बेकेट’ या विदेशी चित्रपटावरुन ’नमक हराम’ बेतला होता. मराठी रंगभूमीवरही याच थीमवर आधारित ’बेकेट’ नाटक आले. नाटकाचे चित्रपटात माध्यमांतर करताना ते दृश्य माध्यमातून मांडण्याचे कसब कौशल्य हवे. काळ बदललाय. सोशल मीडियाच्या युगात ’फेसबुक फ्रेन्ड’ ही गोष्ट जन्माला आली. फोन अ फ्रेन्ड हीदेखील एक संकल्पना आहे. प्रत्यक्षात भेटायचे नाही. फोनवरची मैत्री असा प्रकार. इराणी हॉटेलमधील राऊंड टेबलाभोवती चार मित्र जमलेत व क्रिकेट, चित्रपट व राजकारणावर मनसोक्त मनमुराद गप्पा करताहेत आणि त्याच वेळेस ज्यूस बांक्समध्ये चार आण्याचे (कालांतराने आठ आण्याचे) नाणे टाकून गाणीदेखील ऐकताहेत ती दोस्तीच वेगळी होती.
या प्रवासात ’मैत्रीची गोष्ट सांगणारे’ चित्रपट वेगळाच ठसा उमटवणारे. नमक हराम तर नक्कीच. रसिकांच्या किमान तीन चार पिढ्या ओलांडूनही या चित्रपटाभोवतीचे वलय कायम आहे हे तर केवढे मोठे यश. दूरदर्शन आला, मॅटीनी शोला पुन्हा पुन्हा येत राहिला, व्हिडीओवर आला, मनोरंजन उपग्रह वाहिनीवरही आला. राजेश खन्ना व अमिताभ बच्चन या दोघांच्याही आवडत्या पाच चित्रपटात ’नमक हराम’ आहे हे विशेषच.

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply