

मुरूड शहरातील नगर परिषद हद्दीत शेगवाडा परिसर असून, या ठिकाणी नुकतेच एका नाल्याच्या बांधकामावरून वातावरण तप्त होऊन ज्यांच्याकडे नगर परिषदेची सत्ता होती.ते गप्प राहिले मात्र या आंदोलनात भारतीय जनता पार्टी उतरताच शेगवाडा परिसरातील जनता भाजपच्या पाठीशी आल्याने विरोधकांना याचा पोटशूळ निर्माण होऊन फक्त गरळ ओकण्याचे काम केले, परंतु भारतीय जनता पार्टीने हिरिरीने काम करून रायगड जिल्हाधिकारी यांचे पत्र आणून उपोषणाची यशस्वी सांगता करून संपूर्ण मुरूड शहरात भाजपच्या या अद्वितीय कामांबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मुरूड शहरातील शेगवाडा परिसरातील नागरिक अपरमेंट हॉटेलसमोरील मुरूड नगर परिषदेने नागरिकांना विश्वासात न घेता नाल्याचे बांधकाम केले होते. या नाल्यातून फार पूर्वीपासून शेगवाडा परिसरातील पावसाचे पाणी समुद्राला मिळत असते, परंतु नगर परिषदेला सदरचे ओहळचे बांधकाम वादग्रस्त असताना सुद्धा स्वतःचा मनमानीपणा करून नाल्यावर गोल चार पाइप टाकून हे काम पूर्ण केले. सदरील नाल्यावरील बांधकाम तोडावे यासाठी येथील लोक मागील तीन दिवसांपासून उपोषणाला बसले होते यासाठी याच पाखाडीतील अरविंद गायकर व शैलेश खोत हे उपोषणास बसले होते, परंतु मुरूड नगर परिषदेस प्रशासकीय अडचण आल्याने ते या नाल्यावरील बांधकाम तोडू शकत नव्हते, परंतु या शेगवडा परिसरातील नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टीचे अलिबाग मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड महेश मोहिते धावून आले व त्यांनी तातडीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बातचीत करून जिल्हाधिकारी यांची भेट घेत लोकांना असणारा या नाल्यापासून त्रास विषद करून सदरचा नाला तोडण्यासाठी आपण आदेश पारित करावे, अशी आग्रही भूमिका मांडली. तद्नंतर घडामोडी जलद घडून जिल्हाधिकारी यांनी मुरूड नगर परिषदेने उचित निर्णय लोकहितार्थ घ्यावा, असे आदेश दिल्याने उपोषणकर्ते व शेगवडा रहिवासी यांचे समाधान होऊन अॅड महेश मोहिते यांच्या हस्ते फळाचा रस पिऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. या वेळी मोहिते यांच्यासमवेत भाजप सरचिटणीस अॅड परेश देशमुख सुद्धा उपस्थित होते. या उपोषणाच्या समाप्तीच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे झेंडे सर्वत्र डोलाने डोलत होते. ही जळजळ मात्र विरोधकांच्या मनात कायम सल करून राहणार आहे. या वेळी शेगवाडा पाखाडी अध्यक्ष सुधीर पाटील, अशील ठाकूर, भाजप ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण बैकर, बाळा भगत, उपाध्यक्ष महेश मानकर, जगदीश पाटील व असंख्य शेगवाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अलिबाग, मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी नेहमीच जनतेच्या हिताची कामे करणार असून नाल्याचा लागणारा सर्व खर्च आम्ही जिल्हा नियोजन मंडळाकडून देणार आहोत. सदरच्या कामासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठे सहकार्य केले आहे. प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे नगर परिषद हे बांधकाम तोडू शकत नव्हती, परंतु आम्ही यावर मात करून दाखवली आहे. मुरूड नगर परिषदेला आता जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे नगर परिषदेने सिमेंट पाइप काढून स्लॅब ड्रेनेजचे काम करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे मत या वेळी अॅड. मोहिते यांनी व्यक्त केले होते. या वेळी शेगवाडा पाखाडी अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपल्या भाषणातून अॅड. महेश मोहिते यांचे बहुमूल्य सहकार्य लाभल्यानेच जिल्हाधिकारी यांच्याकडून पत्र मिळू शकले आहे. शेगवाडा सर्व नागरिक त्यांचे ऋणी राहतील, असे ते या वेळी म्हणाले होते. सर्व काही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सदरचे काम झालेले असताना जिल्हाधिकारी यांच्या पत्राचा अर्थ व्यवस्थित समजून न घेता मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना हे उपस्थित नगरसेवकांना समजावून सांगता न आल्याने पुढचा युक्तिवाद मांडून हे काम प्रलंबित ठेवण्यात आले. शेगवाडा परिसरातील नाल्याचे बांधकाम तोडण्यासाठी मुरूड नगर परिषदेने नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांची सभा नगर परिषद सभागृहात लावली होती. या वेळी सर्व नगरसेवकांनी मुद्दा उपस्थित केला की, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्रात नाल्याचे बांधकाम तोडावे, असे स्पष्ट आदेश नसल्याने आपण हे बांधकाम कसे तोडू शकतो असे विचार आले. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी यांना पत्रव्यहार करून नाल्यावरील बांधकाम तोडण्यासाठी स्पष्ट आदेश मिळावेत यासाठी सर्व नगरसेवकांनी एकमुखाने ठराव पारित करून त्याप्रमाणे पत्रव्यवहार करण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती मुरूड नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी पत्रकारांना दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी यांनी पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्र औद्योगिक नगर परिषद, नगर पंचायत अधिनियम 1965चे कलम 96 (2) अन्वये प्रत्येक पालिका सदस्य अथवा नगर परिषद अधिकारी नगर परिषदेच्या मालकीची अथवा नियंत्रणाखाली मालमत्तेच्या हमीबद्दल किंवा नुकसानीबद्दल गैरवर्तणूक झाली असेल, तर नगर परिषदेस जबाबदार धरले जाते. अशा वेळी झालेल्या नुकसानीचे पैसेसुद्धा भरावे लागतात. त्यामुळे नाल्यावरील बांधकाम तोडल्यास मोठ्या समस्येस सामोरे जावे लागणार आहे. कायदेशीर अडचण आल्यानेच सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांचे स्पष्ट आदेश तोडण्याबाबत मिळण्याची मागणी केली असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांचे पत्र संदिग्ध असून या पत्रात तोडण्याचे आदेश नसून नगर परिषद स्तरावर कार्यवाही आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यव्हार करून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आल्याचे या वेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले. मुरूड नगर परिषदेने असा निर्णय घेतल्यामुळे शेगवाडा परिसरातील नागरिक नाराज झाले असून भारतीय जनता पार्टीने मदत करूनसुद्धा नगर परिषदेला हे काम तोडता न आल्याने ही मंडळी पुन्हा भाजपची मदत घेणार आहेत. या वेळी जिल्हाधिकारी यांचे पत्रसुद्धा थोड्याच दिवसात मिळवून देणार असल्याने सर्वत्र या भागात भाजपचा बोलबाला असून मुरूड शहर व तालुक्यात तातडीने काम करून देऊन लोकांना प्रतिसाद भरघोस मिळत असल्याने विरोधक मात्र गर्भगळीत झाल्याचे पाहावयास मिळत आहे. लोकांना वेळीच मदत केली तर लोक आपलेसे होतात हे या प्रकरणातून दिसून आले आहे. शेगवाडा परिसरातील लोकांनी 15 दिवस अगोदर नोटीस व तद्नंतर उपोषणाचे तीन दिवस जाऊनसुद्धा लोकांनी लक्ष न दिल्याने अखेर भारतीय जनता पार्टीने सर्व मदत केल्याने लोकांचा वाढता पाठिंबा हा इथे चर्चेचा विषय ठरत आहे.
-संजय करडे, खबरबात