अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला. असो, हा विषय वेगळा..!!) काही चलाख लोकांनी व्यापारीकरण केल असल्यास त्यात नवल ते काही नाही..!
कोणतीही गोष्ट करायची असेल तर तिच्या स्वतःच्या अशा काही अटीं-शर्ती असतात आणि त्या पूर्ण केल्याशिवाय तो गोष्ट करता येत नाही. योगासने, मेडीटेशनचाही याला अपवाद नाही. योग, मेडीटेशनसाठी फार मोठी जागा आणि साहित्य आवश्यक नसले तरी जिथे या गोष्टी करायच्या असतात तिथले वातावरण मात्र शांत आणि प्रसन्न हवे. मुंबईसारख्या शहरात या दोन गोष्टीचीच जास्त वानवा असते. आणि म्हणून मग महागडी फी भरून एखादा एअर कंडीशन्ड क्लास जॉईन करणं आलं. मुंबई सारख्या शहरात शांत आणि प्रसन्न वातावरण एखाद्या स्प्लिट एसी (विंडो नाही. हा आवाज करतो फार.) असलेल्या जागेतच मिळू शकत. पुन्हा असा क्लास जॉईन करण्यात प्रत्यक्ष मन:शांती मिळवण्याचा भाग किती आणि दुसर्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी सांगण्याचा भाग किती ही गोष्ट वेगळी.
मेडीटेशनसाठी सुरुवातीला वेळ लागत असला, तरी एकदा शिकल्यावर पुढे फार वेळ द्यावा लागत नाही. मात्र याला कोणीतरी गुरु लागतो. योग आणि मेडीटेशनसाठीची महत्वाची गरज म्हणजे पायाला अथवा पाठीला रग लागणार नाही असे बैठकीचे योग्य असे आसन घालता येणे. सुखासन, स्वस्तिकासन, अर्ध पद्मासन, पद्मासन अथवा वज्रासन सारखी आसने सरावाशिवाय 15 मिनिटे घालणं तसं अवघडच. अशा वेळी होतं काय, की मेडीटेशनपेक्षा सांध्याना अथवा पाठीला लागलेल्या रगीकडेच जास्त लक्ष जातं. देवळात गेल्यावर देवापेक्षा बाहेर काढून ठेवलेल्या चपलेकडे आपलं जास्तं लक्ष असतं ना, तसं. बर, शांत आडवं पडून मेडीटेशन केल्यास झोप लागण्याची शक्यता, म्हणून तेही टाळणे योग्य. योगासन किंवा मेडीटेशन तब्येतीला आणि मनाला कितीही उपकारक असल्यामुळे त्याची तयारी, त्याच्या अटीं-शर्ती वैगेरे गोष्टी पाहता ती करण्यापेक्षा, माझा तरी, टाळण्याकडे कल जास्तं असतो. असं केल्यानं महागडी फी आणि त्यासाठीच्या आसनांचा द्राविडी ‘प्राणायाम’ वाचला हा विचार माझ्यासारख्याला वेगळीच मन:शांती देऊन जातो हा आपला आनुषंगिक फायदा..!(इथे योगगुरू आणि मेडीटेशन वाल्यांचा अपमान करायचा यत्किंचितही हेतू नाही.)
वरील विवेचनासाठी एवढं घडाभर तेल घालण्याच कारण, म्हणजे नुकताच श्रीमती शेफाली वैद्य यांनी लिहिलेला, ‘पुस्तकाची ताकद’ हा माझ्या वाचनात आलेला लेख. मला जे काही पुढे सांगायचंय ते थोडंसं वेगळं असलं तरी, ते त्या लेखातल्या आशयाशी आणि वरील विवेचनाशी सख्खं नातं सांगणारं आहे.
खरंच, पुस्तकात भन्नाट, आपण कल्पना करू शकणार एवढी ताकद असते. पुस्तकातच कशाला, आपल्याला मनापासून आवडणार्या प्रत्येक गोष्टीत ती ताकद ठासून भरलेली असते. इथे पुस्तकाबद्दल म्हणायचं कारण एवढंच, की मी या ताकदीचा मन:पूत अनुभव घेतलाय आणि दररोज घेतो म्हणून तुम्हाला अधिकाराने सांगतोय. पुस्तक ही एक वेगळीच दुनिया आहे. तहान-भूक-संसार-वंचना-विवंचना-भवताल या सार्या- सार्याचा विसर पाडणारी ही मोहक भूल आहे. मला तर हातात एखादं पुस्तक मिळालं, तर बाकी काही काही नसलं तरी चालतं. साधारणत: रोम जळत असताना फिडल वाजवणार्या निरोसारखी माझी अवस्था होते. नीरोची रमण्याची कारणं वेगळी असतील कदाचित, पण मी पुस्तकात एकदा शिरलो, की मग आजूबाजूला काय जळतय किंवा शिजतय किंवा वाजतंय याकडे माझं अजिबात म्हणजे अजिबात लक्ष नसतं. माझ्या आणि माझ्या पत्नीतल्या वादाचं (खर तर भांडणच ते, पण वाद तत्वासाठी होतात आणि वाद म्हटलं की आपोआप एक तात्विक मुलामा मिळतो..!) माझं वाचनाचं वेड हे एक महत्वाचं आणि एकमेवंही कारणं आहे.
मेडीटेशनचा उपयोग स्वतःला विसरून कुठेतरी एकरूप होण हा असतो हे मला ऐकून माहित आहे. ही अवस्था समाधी लागण्याच्या जवळपास असते अशी माझी समजूत आहे. आणि ती समजूत जर खरी असेल , तर मी खात्रीने सांगू शकतो, की पुस्तक वाचताना माझीही अगदी गाढ समाधी लागते. अगदी स्वतःला विसरण्याइतकी गहन समाधी लागते. मी ध्यान, योग वैगेरें महत्तमांच्या वाटेला कधी गेलो नाही, पण त्यातून जी अनुभूती ते करणारांना मिळत असेल, त्यापेक्षा मला मिळणारी अनुभूती कणभरही कमी नाही. उलट फायदा एक आहे, की पुस्तक वाचण्यासाठी कोणतीही शांतता, पवित्र वातावरण वैगेरेची काहीच पूर्व अट नाही. पूर्व अट असेल तर ती एकच, आवड हवी. पुस्तकाची आवड असली की भर वाळवंटातही हिमालयातली शांतता आणि शीतलता अनुभवता येते. भगवंताशी तादात्म्य पावण्याचा काय अनुभव त्या संताना आला असेल तो असेल, पण पुस्तकाशी तादात्म्य पावण्याचा अनुभवही त्या संतांच्या त्या दिव्य अनुभवापेक्षा वेगळा नसतो. पुस्तकाचा हा अनुभव पुस्तकाचं आणि वाचनाचं वेड असणार्या सर्वांनाच येत असतो. एकदा का पुस्तक वाचायला सुरुवात केली, की हळूहळू त्या पुस्तकाचा विषय आपली पकड घेतो आणि मग आपण, आपण न उरता, त्या पुस्तकातल एक कॅरॅक्टर किंवा त्यातील घटनांचा साक्षीदार कधी बनून जातो हेच कळत नाही. समाधी लागणं, मला वाटतं, यापेक्षा वेगळं नसावं.
मुंबई सारख्या डोक्याला सदोतीत तापच देणार्या शहरात, तर मला पुस्तकाएवढा सच्चा आणि नि:स्वार्थ साथी दुसरा भेटला नाही. कोर्टात आपला नंबर कधी लागतो याची वाट पाहणं असो की कोणा येणाराची वाट पाहणं असो, किंवा मग मुंबईच्या लोकल मधला तो गुरांपेक्षाही वाईट दररोजचा प्रवास असो, पुस्तक सोबत असलं, की त्या सगळ्या त्रासाचा क्षणात विसर पडतो. कोर्टातला तो कंटाळवाणा आणि न कळणारा शब्दच्छल, लोकलमधली घामट गर्दी, घर-ऑफिसच टेन्शन या सर्वावर माझ्यासाठी पुस्तक हा जालीम उतारा आहे. सततच टेन्शन, स्ट्रेस वैगेरेमुळे रक्तदाब, मधुमेहसारखे आपल्याकडे मुक्कामाला आलेले भाडेकरू हळूहळू ‘ओनरशिप’चा अधिकार घेऊन कधी बसतात तेच कळत नाही. पुस्तकासारखं व्यसन असेल तर मात्र मुळात ते मुक्कामाला येत नाहीत आणि आले तरी ‘लिव्ह अँड लायसेन्स’धारकासारखे बघा कसे गुमान आपल्या पातळीत राहतात ते.
मी हे पुस्तकांबद्दल बोलत असलो तरी हा नियम सर्वप्रकारच्या छंदांसाठी लागू आहे. माणसाला छंद हवा, कोणताही चालेल, पण हवा..! मन रमून, एकाग्र होऊन मन:शांतीचा समाधीसारखा अनुभव देणारा छंदांसारखा दुसरा मार्ग नाही. एसी क्लास नको, महागडी फी नको, कुठलीही अवघड आसनं नकोत की कोणताही ड्रेस कोड नको एवढे फायदे छंदांचे असतात. इतर छंदांना कदाचित काही पथ्य पाळावी लागत असतील किंवा पायपिट, कष्ट करावे लागत असतील, माहित नाही, पण पुस्तकाचे असले काहीच चोचले नसतात. अगदी स्मशानातही चीतेवरील असामी व्यवस्थित जळेपर्यंत पुस्तक काढून निवांत वाचत बसता येतं. तसा फार खर्चिकही नाही हा छंद. मुंबईसारख्या शहरात तर रद्दीवाल्यांची दुकान आणि फुटपाथवर कितीतरी पुस्तक एकदम कचरे के भाव मिळतात. कचर्यातून मूल्य न करता येणारं अमूर्त सोनं देणारी ही जगातली एकमेव गोष्ट असावी.
शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्रित आणून मन:शांतीची अत्युच्च पातळी गाठणे म्हणजे समाधी अशी जर समाधीची व्याख्या असेल, तर ती पुस्तकाला फिट्ट बसते असं मी खात्रीने म्हणू शकतो..!
-नितीन साळुंखे (मो. क्र. 9321811091)